पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांची आॅडिओ क्लिप सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लॉकडाऊन, तसेच पालिका प्रशासनाच्या कोविड नियंत्रणावर पालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत उपमहापौर जगदीश गायकवाड यांना एका वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रियेबाबत विचारणा केली असता; गायकवाड यांनी आपली उद्विग्नता व्यक्त करीत पालिकेच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली.क्लिपमध्ये उपमहापौरांनी आपल्या भावना व्यक्त करीत पालिका प्रशासनाचे धिंडवडे काढत, लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे सांगत, पालिका प्रशासनामार्फत योग्य उपाययोजना राबविल्या जात नसल्याचा आरोप केला. यावेळी गायकवाड यांनी अत्यंत उद्विग्न भाषेत आपली नाराजी व्यक्त केली. या प्रतिक्रियेची आॅडिओ क्लिप व्हॉट्सअॅप, फेसबुकवर मोठ्या प्रमाणात ही क्लिप झळकत असताना, तिच्या सत्यतेबाबत उपमहापौर जगदीश गायकवाड यांना विचारणा केली असता, त्यांनी संबंधित क्लिप माझीच असल्याचे सांगत, पालिका प्रशासनावर उघडपणे नाराजी व्यक्त केली. सध्याच्या घडीला कोविड रुग्णांचे मोठे हाल सुरू आहेत. पनवेलकर मरत आहेत. चाचणीच्या नावाखाली लॅबकडून लोकांची लूट सुरू आहे. रुग्णालयात इतर उपचारासाठी जाणारे नागरिक कोरोनाने बाधित होत आहेत. पालिकेचा उपमहापौर या नात्याने आम्हाला अनेक रुग्णांचे, नातेवाइकांचे फोन येत आहेत. पालिका प्रशासनावर उघडपणे नाराजी व्यक्त करीत असून, लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हालाही नागरिक दोष देत आहेत. त्यामुळे उद्विग्नपणे मी माझ्या भावना व्यक्त केल्या.खासगी रुग्णालयामार्फत केवळ रोख पैसे देणाºया कोविड रुग्णांनाच उपचार दिले जात आहेत. इन्शुरन्स पॉलिसी असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केली जात आहे. पनवेल महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. जगदीश गायकवाड हे भाजपाचे उपमहापौर आहेत.या क्लिपमध्ये उपमहापौरांनी वापरलेल्या भाषेबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पालिका प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर असला, तरी ज्या भाषेचा वापर केला आहे, त्या भाषेचे समर्थन करता येणार नसल्याचे पनवेलकरांचे म्हणणेआहे.
पनवेलच्या उपमहापौरांची आॅडिओ क्लिप व्हायरल, उद्विग्नता व्यक्त करीत पालिकेवर नाराजीचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 12:15 AM