पनवेलमध्ये फेरीवाल्यांचा महामोर्चा
By admin | Published: January 25, 2017 05:03 AM2017-01-25T05:03:59+5:302017-01-25T05:03:59+5:30
पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यापासून शहर व परिसरातील हजारो बेकायदा हातगाड्या व फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात
पनवेल : पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यापासून शहर व परिसरातील हजारो बेकायदा हातगाड्या व फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. कारवाईच्या विरोधात महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन संलग्न नॅशनल हॉकर्स फेडरेशन व महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटना पनवेल यांनी महापालिकेवर मोर्चा काढला होता. यावेळी हजारो फेरीवाले सहभागी झाले होते.
पनवेल शिवाजी सर्कलपासून सुरू झालेला हा मोर्चा पनवेल महापालिकेच्या समोर येऊन धडकला. पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत मोर्चाचे रु पांतर सभेत झाले. जगण्याचा अधिकार हा घटनात्मक अधिकार असून या अधिकारापासून फेरीवाल्यांना वंचित करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पथविक्रेता अधिनियम २०१४ या संसदेत पारित केलेल्या कायद्याचे पनवेलमध्ये उल्लंघन करण्यात येत असल्याचा आरोप मोर्चात करण्यात आला. यावेळी अनेकांच्या हातात पालिकेच्या विरोधात निषेध करणारे फलक होते. एकीकडे पनवेलला स्मार्ट सिटी बनविण्याचा विचार होत आहे, तर दुसरीकडे हजारो फेरिवाल्यांचे रोजगार हिरावून घेतले जात आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे फेरीवाले, पथ विक्रेते म्हणून स्वयंरोजगार करणाऱ्या श्रमिकांवर उपासमारीची वेळ आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मोर्चात माजी नगरसेवक संदीप पाटील, गणेश कडू, अनुराधा ठोकळ, विनिता बाळेकुंद्री, एस.के.नाईक आदींसह हजारो फेरीवाले उपस्थित होते. (वार्ताहर)