सेक्शन गरम आहे; सध्या शांतता पाळा; अधिवेशनामुळे पनवेलचे लेडीज बार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 10:03 AM2024-07-02T10:03:22+5:302024-07-02T10:03:35+5:30
प्रत्यक्षात या बारमधील लेडी वेटर्स प्रत्यक्षात नृत्यांगना म्हणून काम करतात. या नृत्यांगनावर पैसे उधळण्यासाठी ग्राहक लेडीज बारमध्ये येतात.
वैभव गायकर
पनवेल : रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे लेडीज बार चर्चेचा विषय ठरत असताे. एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू असताना पनवेलमधील लेडीज बार बारचालकांकडून बंद ठेवण्यात येत आहेत. सेक्शन गरम असल्याने बार बंद ठेवून कमालीची शांतता बाळगण्यात येत असल्याची प्रचिती सध्या येत आहे.
पनवेल तालुक्यात एकूण २४ सर्व्हिस आणि ऑर्केस्ट्रा बार आहेत. यामध्ये पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या अंतर्गत १० बार, पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत ९, कळंबोली ३ आणि तळोजा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत २ बारचा समावेश आहे. हे कागदोपत्री सर्व्हिस आणि ऑर्केस्ट्रा म्हणून ओळखले जात असले तरी प्रत्यक्षात या बारमधील लेडी वेटर्स प्रत्यक्षात नृत्यांगना म्हणून काम करतात. या नृत्यांगनावर पैसे उधळण्यासाठी ग्राहक लेडीज बारमध्ये येतात.
या मागील आर्थिक गणितात उत्पादन शुल्क, पोलिस प्रशासन आणि इतर सर्व आस्थापनांना मॅनेज केले जाते. मात्र, अधिवेशनाच्या काळात हे बारमालक रिस्क न घेता हे बार बंद ठेवतात. अधिवेशनाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील या हेतूने हे बार जाणीवपूर्वक बंद ठेवले जातात. या व्यतिरिक्त सोशल क्लब, हुक्का पार्लर आणि काळा-पिवळा यासारखे अवैध जुगारदेखील पनवेलमध्ये बेसुमार चालतात. अधिवेशनाच्या काळात पनवेलमध्ये हे सर्व धंदे बंद आहेत. सेक्शन गरम असल्याने हे व्यवसाय बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये शुकशुकाट सुरू आहे.
चक्र थांबणार कधी ?
अधिवेशन काळात बंद असलेले हे बार अथवा इतर अवैध धंदे इतर वेळा सर्रास सुरू असतात. या आस्थापनांवर कारवाईदेखील वेळोवेळी सुरू असते. मात्र, हे धंदे कायमस्वरूपी कधी बंद होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. शासन मनावर घेत नाही तोपर्यंत हे व्यवसाय बंद होणार नाहीत, अन्यथा कारवाईचे चक्र चालूच राहणार आहे.
बारचालकांना वेळेत बंद करण्याच्या सूचना आम्ही यापूर्वीच दिल्या आहेत. याबाबत वेळोवेळी कारवाईदेखील सुरूच असते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनेवर कठोर कारवाई केली जाईल. - विवेक पानसरे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन, नवी मुंबई पोलिस आयुक्तालय
उत्पादन शुल्क विभागामार्फत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारचालकांवर कारवाई करीत असतो. याकरिता आमच्या पथकाची नियमित गस्त या ठिकाणी असते. - आर. आर. कोळे, जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादनशुल्क