पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील टॉप पाच मतदारसंघातील एक असून, नव्याने झालेल्या मतदार नोंदणीत जवळपास ४३ हजार मतदार वाढल्याने पनवेल विधानसभेची मतदारसंख्या ६ लाखांच्या पार झाली आहे. यात ६५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदार शहरी भागातील असल्याने या मतदारांवर या मतदारसंघाची धुरा असणार आहे.
एकेकाळी उरण आणि पनवेल हे दोन्ही मतदारसंघ एकच होते. सिडको प्रकल्पामुळे नवीन नोड स्थापन केले गेले. या नोडमध्ये कालांतराने शहरी मतदार वाढू लागले. शिवाय तालुक्यातील २३ ग्रामपंचायती पनवेल महानगरपालिकेत विलीन होऊन पनवेल महापालिका उदयास आली. मुंबईतील वाहतूक कोंडी, प्रदूषण, गर्दी यामुळे अनेकांनी पनवेल परिसरात धाव घेतली. यामुळे झपाट्याने शहराची लोकसंख्या वाढली. एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आज भाजपचा गड बनला आहे. शेकापची स्थानिकांसोबत जुळलेली नाळ त्या तुलनेत शहरी मतदारांना आपलेसे करू शकली नसल्याने शेकापमधून बाहेर पडलेले आ. प्रशांत ठाकूर तीन वेळा येथून निवडून आले. या विजयामागे शहरी मतदार महत्त्वाचा फॅक्टर आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील ५४४ पैकी जवळपास ३७० बूथ शहरी भागातील असल्यामुळे येथील उमेदवारांना शहरी मतदारांची मतांवर आपली छाप सोडावी लागणार आहे. सध्याच्या घडीला पनवेल विधानसभेत भाजपकडून आमदार प्रशांत ठाकूर, शेकापमधून माजी आमदार बाळाराम पाटील तसेच उद्धवसेवेतून शिरीष घरत आणि लीना गरड यांची नावे चर्चेत आहेत. अपक्ष म्हणून कांतीलाल कडूदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
पनवेलमधील मतदार -३,३७,९०९ पुरुष २,९६,२१५ महिला ७३ तृतीयपंथी६,३४,१९७ एकूण मतदार
प्रचाराची सुरुवातही...शहरी भागात खांदा कॉलनी, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, नावडे, कामोठे, तळोजे या सिडकोनिर्मित वसाहतीत ३१७ बूथ आहेत. तर ग्रामीण भागात १४४ बूथ आहेत. यामध्ये देखील ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना ३१ हजारांची लीड मिळाली होती, तर उद्धवसेनेच्या मशाल चिन्हावर लढणाऱ्या संजोग वाघेरे यांनादेखील पनवेलध्ये फटका बसला होता. यामुळे शहरी मतदारांवर डोळा ठेवून अनेक संभाव्य उमेदवारांनी आपल्या परीने प्रचाराला सुरुवात केली आहे.
नैनाविरोधात नाराजीपनवेलमध्ये सिडकोने नैना प्रकल्प राबविला आहे. या प्रकल्पाच्या धोरणाविरोधात वेळोवेळी निदर्शन करण्यात आली. नैना प्रकल्पाबाबत नाराजी हा ग्रामीण भागातील कळीचा मुद्दा आहे.
पाण्याचा प्रश्न भीषणपनवेलची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सिडको एकीकडे हजारो घरांचे गृहप्रकल्प उभारत असताना दुसरीकडे पूर्वीच्या गृहप्रकल्पांना मुबलक पाणी मिळत नाही. याव्यतिरिक्त पालिका हद्दीत वाढीव मालमत्ता कर, प्रदूषण हे विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहेत.