सिडको नोडसह पनवेलची स्वच्छतेकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:05 AM2019-05-15T00:05:20+5:302019-05-15T00:05:35+5:30
पनवेल महानगरपालिका क्षेत्रांतील रस्त्यांसह दुभाजक आणि पदपथ स्वच्छ करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यामुळे कळंबोलीसह पनवेल शहरातील रस्ते व पदपथ चकाचक झाले आहेत.
कळंबोली : पनवेल महानगरपालिका क्षेत्रांतील रस्त्यांसह दुभाजक आणि पदपथ स्वच्छ करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यामुळे कळंबोलीसह पनवेल शहरातील रस्ते व पदपथ चकाचक झाले आहेत. विशेष म्हणजे रस्त्यांसह आजूबाजूचे मोकळे भूखंड सुद्धा स्वच्छ करण्यात आले आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रात २९ महसुली गावांसह सिडको वसाहत आणि नगरपरिषद क्षेत्रांचा समावेश आहे. पनवेल महापालिकेने आपल्या क्षेत्रात व्यापक प्रमाणात स्वच्छता अभियान राबविले आहे. त्यामुळे शहरात नेहमी दिसणारे कचऱ्याचे ढीग आता दुर्मीळ झाले आहेत. विशेष म्हणजे कचरा व्यवस्थापन सिडकोकडे असताना शहरात अपेक्षित स्वच्छता राखली गेली नाही. त्यामुळे ठिकठिकाणी कचºयाचे साम्राज्य पाहावयास मिळत असे. मात्र ही सेवा वर्ग झाल्यानंतर महापालिकेने स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. सध्या शहरात दोन वेळा घंटागाडीतून कचरा संकलित केला जातो. शिवाय रस्ते व पदपथांची नियमित स्वच्छता केली जाते. सफाईचे काम करणाºया प्रत्येक कर्मचाºयाला दिवसाला ८00 ते ९00 मीटर रस्ता स्वच्छ करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या कामात कोणत्याही प्रकारची कुचराई होवू नये, यादृष्टीने उपाययोजना केल्या आहेत. रस्त्यासह दुभाजक आणि पदपथांवर कचरा साचणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. याचा परिणाम म्हणून रस्ते, दुभाजक, पदपथ आणि मैदान चकाचक दिसत आहेत.
पाणी निचरा होणारे मार्ग मोकळे
रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा गटारांमध्ये निचरा व्हावा, यादृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार रस्त्यालगतचे पाण्याचे मार्ग मोकळे करण्यात आले आहेत. पनवेल शहरासह सिडको नोड्स, कळंबोली स्टील मार्केट आणि तळोजा एमआयडीसी क्षेत्रातसुद्धा लक्षणीय स्वच्छता दिसून येत आहे.