पनवेल महापालिकेने बायोमेडिकल वेस्टप्रकरणी मागितला खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:08 AM2018-10-31T00:08:28+5:302018-10-31T00:08:54+5:30
खांदा वसाहतीतील रस्त्यावर सापडलेल्या बायोमेडिकल वेस्टप्रकरणी पनवेल महापालिकेने भालेकर पॅथॉलॉजी लॅबोरेटरीला नोटीस धाडून खुलासा मागितला आहे.
कळंबोली : खांदा वसाहतीतील रस्त्यावर सापडलेल्या बायोमेडिकल वेस्टप्रकरणी पनवेल महापालिकेने भालेकर पॅथॉलॉजी लॅबोरेटरीला नोटीस धाडून खुलासा मागितला आहे. मात्र, लॅबने हे वेस्ट आमचे नसल्याचे स्पष्टीकरण आधीच महापालिकेला दिले आहे. त्यामुळे आता आरोग्य विभाग नेमकी काय कारवाई करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खांदा वसाहतीत शनिवारी सकाळी सीकेटी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बायो मेडिकल वेस्ट टाकण्यात आले होते. माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी ही बाब आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर लगेचच पर्यवेक्षक मनोज टाक, आदेश गायकवाड आणि मनोज चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या कचºयात युरिनच्या चाचणीकरिता वापरण्यात येणारे कंटेनर, रक्ताचे नमुने साठवण्याच्या बाटल्या, सिरिंज, सुयांच्या समावेश आहे. त्या बाटल्यांवरील रुग्णांची नावे हे परिसरातील लॅबमधील नावाच्या यादीत होते, असे आरोग्य विभागाच्या पर्यवेक्षकांचे म्हणणे आहे. त्यानुसार महापालिकेने लॅबला नोटीस देऊन तीन दिवसांत खुलासा न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
बायोमेडिकल वेस्टशी आमचा संबंध नाही
आम्ही मुंबई वेस्ट मॅनेजमेंटबरोबर करार केला आहे. त्याचबरोबर हा प्रकार घडण्याच्या अगोदर मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडून कचरा नेण्यात आला आहे. त्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज आणि कागदपत्रे सुद्धा आमच्याकडे आहेत. त्यामुळे आमच्या लॅबमधून बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर पडूच शकत नाही.
- डॉ. हेमंत भालेकर, भालेकर पॅथॉलॉजी लॅबोरेटरी