पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची अखेर बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:21 AM2018-04-17T02:21:59+5:302018-04-17T02:21:59+5:30
पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. आयुक्तांच्या अचानक झालेल्या या बदलीमुळे पनवेल परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्य सरकारने सोमवारी राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली.
पनवेल : पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. आयुक्तांच्या अचानक झालेल्या या बदलीमुळे पनवेल परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्य सरकारने सोमवारी राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. यात पनवेलचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचाही समावेश असून त्यांची महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर नांदेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पनवेल महानगरपालिकेत सत्ताधारी विरु द्ध आयुक्त असा वाद विकोपाला गेला होता. त्यानुसार सत्ताधारी भाजपाने आयुक्तांविरोधात अविश्वास मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविला आहे. या अविश्वास ठरावात आयुक्तांवर भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप करण्यात आले होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तांवरील अविश्वास ठराव निलंबित करीत त्यांना अप्रत्यक्ष अभय दिले होते. या निर्णयाद्वारे मुख्यमंत्र्यांनी पनवेलमधील सत्ताधाºयांना घरचा अहेर दिल्याची चर्चा सुरू असतानाच सोमवारी आयुक्तांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. त्यामुळे पनवेलकरांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी एकीकडे आयुक्तांना क्लीन चिट दिली तरी त्यांची बदली करून पनवेलमधील भाजपाला खूश करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सध्या पनवेलमध्ये रंगली आहे.
आयुक्त डॉ. शिंदे यांच्या समर्थनार्थ पनवेलमधील अनेक सामाजिक संघटना एकवटल्या होत्या. त्यासाठी आयुक्तांच्या समर्थनार्थ विश्वासदर्शक ठराव मंजूर करीत तो शासनाकडे पाठविण्यात आला होता. सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी अरु ण भिसे, कांतीलाल कडू यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीत विविध कार्यक्र म राबवून आयुक्तांची बदली थांबविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले होते.
विशेष म्हणजे यासंदर्भात विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचीदेखील भेट घेतली होती. महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या शेकापनेदेखील आयुक्तांच्या अविश्वास ठरावाच्या विरोधात भूमिका घेतली होती. यातच डॉ. शिंदे यांची तडकाफडकी बदली झाल्याने राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, आयुक्तांच्या बदलीमुळे सत्ताधारी भाजपाने आनंद व्यक्त केला आहे. तर या निर्णयाच्या विरोधात कायदेशीर लढा देण्याचा निर्णय सामाजिक संघटनांनी घेतला आहे.
एकीकडे शासन आयुक्तांना त्यांच्या पारदर्शक कामाबद्दल क्लीन चिट देते आणि दुसरीकडे लगेच त्यांची बदली करते, हे चुकीचे आहे. हाच का भाजपाचा पारदर्शक कारभार? आयुक्तांची बदली झाली असली तरी सत्ताधाºयांना कायद्यांनुसार कामकाज करावे लागणार आहे. पालिकेत आम्ही कोणाची मुजोरी खपवून घेणार नाही .
- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्ष नेते
आयुक्त्यांच्या बदलीविरोधात मी काहीही प्रतिक्रि या देणार नाही. मात्र प्रशासकीय अधिकाºयांच्या बदल्या होतच असतात.
- परेश ठाकूर,
सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका