पनवेल : रेल्वे रूळ ओलांडणे कायद्याने गुन्हा असताना चक्क पनवेल महापालिकेचे आयुक्त आणि महापौर यांनी रेल्वे रूळ ओलांडल्याची घटना सोमवारी धाकटा खांदा याठिकाणी घडली. धाकटा खांदा येथील पनवेल महापालिकेच्या श्री गणेश विद्यामंदिर शाळेतील पहिल्या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या स्वागताचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. शाळेपासून हाकेच्या अंतरावर हार्बर मार्गावरील हे रेल्वे रूळ आहे. शाळेत जाण्यासाठी आयुक्तांसहमहापौर व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे रूळ ओलांडले.सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्यांचे हात धरून आयुक्त गणेश देशमुख यांनी त्यांचे वर्गात स्वागत केले. शाळेत येण्यासाठी गावातून वेगळा रस्ता असताना देखील आयुक्त गणेश देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह पालिका अधिकाऱ्यांनी शॉर्टकट घेऊन रेल्वे रूळ ओलांडत शाळा गाठली.धाकटा खांदा गावात प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग आहेत. मात्र सर्कस मैदान येथून देखील रेल्वे रूळ ओलांडून गावात प्रवेश करता येतो. याठिकाणी पादचारी पूल नसल्याने येथील ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी तसेच पालक देखील नियमित हा रेल्वे रूळ ओलांडून नियमांचे उल्लंघन करतात. मात्र शहरातील प्रथम नागरिक महापौर आणि प्रशासक म्हणून आयुक्त यांनीच रेल्वे रूळ ओलांडून नियम पायदळी तुडविल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आयुक्तांनी रेल्वे रूळ ओलांडल्याचे छायाचित्र यावेळी कॅमेऱ्यात कैद झाले आहे.अडचणीतून विद्यार्थी कशाप्रकारे मार्गक्रमण करतात याची माहिती घेण्यासाठी ही शाळा निवडली होती. याच ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून पादचारी पूल उभारणीचे काम सुरू असल्याने शाळा प्रवेशाच्या निमित्ताने जाणीवपूर्वक पादचारी पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी रेल्वे रुळावर गेलो होतो.- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगर पालिका
पनवेल महापालिकेच्या आयुक्त, महापौरांनी ओलांडले रेल्वे रूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 11:22 PM