पनवेल महापालिकेकडून आरडीसी बँकेला अभय?

By admin | Published: December 22, 2016 06:36 AM2016-12-22T06:36:19+5:302016-12-22T06:36:19+5:30

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने शहरात अतिक्र मण विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या अंतर्गत पदपथावर व्यवसाय

From the Panvel Municipal Corporation | पनवेल महापालिकेकडून आरडीसी बँकेला अभय?

पनवेल महापालिकेकडून आरडीसी बँकेला अभय?

Next

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने शहरात अतिक्र मण विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या अंतर्गत पदपथावर व्यवसाय करणारे फेरीवाले , दुकानदारांचे पत्राशेड हटवून पनवेलचा श्वास मोकळा करण्यात आला आहे. परंतु एमटीएनएनल रोडवरील आरडीसी बँकेने बाहेर मारलेले शेड, तसेच बाहेरच्या अतिक्रमणाला मात्र अभय देण्यात आले आहे. नियम सर्वांना सारखे आहेत की नाही, असा सवाल पनवेलकरांनी उपस्थित केला आहे.
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची पनवेलमध्ये एमडीएनएल रोडवर मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी येथे शाखा आहे. या बँकेने आपल्या शाखेसमोर अतिक्र मण केले आहे. त्यांनी बाहेरचा संपूर्ण पदपथ गिळंकृत केला आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी एटीएम मशिन बसविण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त जनरेटर सुध्दा बाहेरच मांडले आहे त्यामुळे मोठी जागा व्यापली जाते. बँकेने बाहेर शेड सुध्दा टाकले आहे. पनवेल शहरातील अनेक ठिकाणी आयुक्त डॉ . सुधाकर शिंदे यांनी मोहीम घेवून कारवाई केली. बाहेर ठेवलेल्या वस्तू, माल जप्त केला. खुद्द आयुक्तांनी मोहिमेचे नेतृत्व करून दुकानाबाहेरचे फलक, शेडवर हातोडा मारला. असे असताना संबंधित बँकेबाहेरच्या अतिक्र मणावर कारवाई करण्यात आली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे बँकेच्या बाजूला सुध्दा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मात्र आरडीसी बँकेला अभय देण्यात आले आहे. याबाबत पनवेलकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत. डॉ. शिंदे यांनी काही दिवसातच पनवेलचा चेहरामोहरा बदलून टाकला असल्याने त्यांचे याबाबत अभिनंदन होत आहे. परंतु अतिक्र मण हटवताना दुजाभाव करू नये अशी अपेक्षा पनवेलकरांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: From the Panvel Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.