कोविड नियम मोडणाऱ्यांविरोधात पनवेल महापालिका ॲक्शन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 10:05 AM2021-12-31T10:05:23+5:302021-12-31T10:07:40+5:30

Panvel Municipal Corporation : महापालिका ॲक्शन मोडवर राहणार असून नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Panvel Municipal Corporation on action mode against covid rule breakers | कोविड नियम मोडणाऱ्यांविरोधात पनवेल महापालिका ॲक्शन मोडवर

कोविड नियम मोडणाऱ्यांविरोधात पनवेल महापालिका ॲक्शन मोडवर

Next

पनवेल :  कोरानाचे वाढते रुग्ण आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाईसाठी पोलीस विभागाच्या मदतीने महापालिकेने प्रत्येक प्रभागानुसार पालिकेच्या ५० अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी घेण्यात आलेल्या बैठकीत आयुक्त गणेश देशमुख यांनी कर्मचाऱ्यांना  सूचना दिल्या.

महापालिका ॲक्शन मोडवर राहणार असून नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम मर्यादित  करण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे.

या ओमायक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्यांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून  ३१ डिसेंबर व नूतन वर्ष २०२२ चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सदर आदेशांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर  पालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार आहे.

नूतन वर्ष स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० टक्के तर खुल्या जागेत उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्के परवानगी असणार आहे.  या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल, मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्याची  सूचना केली.

Web Title: Panvel Municipal Corporation on action mode against covid rule breakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल