पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पदभार सोडला; प्रशांत रसाळ प्रभारी आयुक्त
By वैभव गायकर | Published: March 20, 2024 04:21 PM2024-03-20T16:21:33+5:302024-03-20T16:22:41+5:30
पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांची दि.19 रोजी अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
वैभव गायकर,पनवेल :पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांची दि.19 रोजी अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. 30 जुन पर्यंत तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या अधिकाऱ्यांना पदमुक्त करण्याच्या सूचना भारतीय निवडणूक आयोगाने शासनाला केल्या नंतर हि बदली करण्यात आली आहे.देशमुख यांच्यासह आरोग्य विभागात उपायुक्त असलेले सचिन पवार आणि मालमत्ता कर विभागातील गणेश शेट्टे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
निवडणुक आयोगाने शासनाला बदल्यावरून खडेबोल सुनावल्यानंतर रातोरात दि.19 रोजी मंगळवारी राज्यभरात तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या आयुक्त,अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या.यामध्ये पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांचा देखील समावेश असल्याने त्यांनी त्वरित या आदेशाचे पालन करीत बुधवारी दि.20 रोजी आपला पदभार सोडत अतिरिक्त आयुक्त डॉ प्रशांत रसाळ यांच्याकडे आपला आयुक्त पदाचा पदभार सोपवला.
पालिकेची विस्कट्लेली घडी बसविण्यात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या आयुक्त गणेश देशमुख यांनी आकृतीबंध मंजुर करून ऐतिहासिक नोकरभरती केली.याव्यतिरिक्त महापौर बंगलो,आयुक्त बंगलो,मालमत्ता कर प्रणाली,जीएसटी अनुदान,माता बाळ रुग्णालय उभारणी.स्वराज्य पालिका मुख्यालयाच्या निर्मिती,प्रभाग कार्यालये उभारणी,नागरी आरोग्य केंद्राचे जाळे पसरवणे,सिडको नोड मधील सेवा सुविधांचे हस्तांतरण,बगीचे गार्डन हस्तांतरण,रस्त्यांचे कॉक्रीटीकरण,पालिका क्षेत्रात एलईडी पथदिवे उभारणी आदींसह असंख्य महत्वाची कामे देशमुख यांनी मार्गी लावली.सत्ताधारी ,विरोधकांना विश्वासात घेऊन समांतर विकासाचा मॉडेल देशमुख यांनी पनवेल मध्ये यशस्वी केल्याने त्यांच्या योगदानाबाबत सत्ताधारी आणि विरोधकही विशेष कौतुक करीत आहेत.