पनवेल पालिकेच्या बोधचिन्ह स्पर्धेवर प्रश्नचिन्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 06:23 AM2017-08-10T06:23:58+5:302017-08-10T06:23:58+5:30
पनवेल शहर महापालिकेच्या स्थापनेनंतर पालिकेचे बोधचिन्ह हे लोकसहभागातून असावे याकरिता खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
वैभव गायकर
पनवेल : पनवेल शहर महापालिकेच्या स्थापनेनंतर पालिकेचे बोधचिन्ह हे लोकसहभागातून असावे याकरिता खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमधूनच अंतिम बोधचिन्ह तयार केले जाईल व प्रथम पसंतीच्या बोधचिन्हाला सुमारे २५ हजार रु पयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे पालिकेने जाहीर केले होते. या स्पर्धेत २०० पेक्षा जास्त कलाकारांनी सहभाग नोंदवून पालिकेचे बोधचिन्ह तयार केले. मात्र एकही बोधचिन्ह महापालिकेने नेमलेल्या समितीला योग्य वाटले नाही. त्यामुळे आता बोधचिन्ह तयार करण्यासाठी सुलेखनकार अच्युत पालव यांची निवड करण्यात आली. मात्र या प्रकाराबद्दल स्पर्धेतील सहभागी कलाकारांनी नाराजी व्यक्त करीत स्पर्धेच्या फेरविचाराची मागणी केली आहे.
पालिकेने जाहीर केलेल्या बोधचिन्हाच्या स्पर्धेत सहा जणांची निवड करण्यात आली आहे. सहा जणांच्या बोध चिन्हाला प्रत्येकी पाच हजार रु पये बक्षीस पालिकेने जाहीर केले. याव्यतिरिक्त आणखी पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ म्हणून प्रशस्तिपत्रक देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र पालिकेच्या या निर्णयाविरोधात कलाकारांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती. २४३ स्पर्धकांपैकी एकाही स्पर्धकाचे बोधचिन्ह अंतिम न केल्यामुळे कलाकारांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
ऐतिहासिक पनवेल नगरपरिषदेचे बोधचिन्ह तयार केलेले हृषिकेश ठाकूर यांनी याबाबत आयुक्तांची भेट घेत स्पर्धेबाबत फेरविचार करण्याची मागणी केली. स्पर्धेपैकी एकही बोधचिन्ह पालिकेच्या संबंधित समितीला आवडले नसेल तर ही स्पर्धा भरवलीच का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे लोकसहभागातून तयार करण्यात येणाºया बोधचिन्हाच्या निवडीबाबत समितीत कलाकारांना स्थान देणे अपेक्षित होते. बुधवारी हृषिकेश ठाकूर यांच्यासह प्रसिद्ध कलाकार अरु ण कारेकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले.
ऐतिहासिक पनवेल नगरपरिषदेचे बोधचिन्ह स्थानिक कलाकार हृषिकेश ठाकूर यांनी २000 साली तयार केले होते. पनवेल शहराची जडणघडण व उद्योग व्यवसायाचा ठळकपणे ठसा या बोधचिन्हात दिसून येतो. पनवेल महानगर पालिकेच्या बोधचिन्हाबाबत पालिकेने स्थानिक कलाकारांना विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे स्थानिक कलाकारांचे म्हणणे आहे.
पनवेल महापालिकेला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. स्थानिक कलाकाराला त्याची माहिती अधिक असते. स्पर्धेच्या समितीमध्ये स्थानिक कलाकाराला स्थान देणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने स्थानिक कलाकारांमध्ये नाराजी आहे. पालिकेने स्पर्धेबाबत फेरविचार करावा.
- हृषिकेश ठाकूर, कलाकार