जप्त प्लास्टिकचे पनवेल महानगरपालिका करणार विघटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 11:34 PM2020-02-05T23:34:22+5:302020-02-05T23:34:51+5:30
महानगरपालिके चे तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची घोषणा केली होती.
- वैभव गायकर
पनवेल : महानगरपालिके चे तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची घोषणा केली होती. या बंदीनंतर पनवेल महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाळगणाऱ्या दुकानदार, व्यापाऱ्यांवर कारवाई केली, या वेळी जप्त के लेल्यासुमारे सात टनांपेक्षा जास्त प्लास्टिकचे पालिका व्यवस्थापन करणार आहे.
पालिकेच्या स्थापनेपासून म्हणजेच २०१७ पासून हे प्लास्टिक एकत्रित जप्त करण्यात आले आहे. आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत जप्त केलेला सुमारे ७९७२.७ किलोग्रॅम प्लास्टिक शास्त्रोक्त पद्धतीने विघटनासाठी गो ग्रीन इन्विरोटेक या रायगड जिल्ह्यातील रोहा स्थित कंपनीला देण्यात येणार आहे.
प्लास्टिक पिशव्याचे सुमारे ३०० पेक्षा जास्त वर्षे विघटन होत नसल्याने पर्यावरणाला मोठा धोका आहे. विशेष म्हणजे, प्लास्टिकमधील घातक घटकांपासून कर्करोगासारखे आजार मोठ्या प्रमाणात बळावत आहेत. अशा परिस्थितीत या प्लास्टिकची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेची आहे, याकरिता महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून सूचित करण्यात आलेल्या रोहा येथील गो ग्रीन इन्विरोटेक कंपनीला हे काम देण्यात आले आहे.
पनवेल महानगरपालिकेने स्थापनेपासून राबविलेल्या प्लास्टिक पिशव्या विरोधी मोहिमेत मोठ्या प्रमाणात दंडदेखील संबंधित दुकानदार व्यापाऱ्यांकडून वसूल केला आहे. ही रक्कम सुमारे ३९ लाख ७१ हजार २०० रुपये एवढी आहे. या दंडाची रक्कमच या प्लास्टिकच्या योग्य विघटनासाठी संबंधित कंपनीला देण्यात येणार आहे. पालिकेने जप्त केलेल्या प्लास्टिकचे योग्य पद्धतीने विघटन होणे गरजेचे असल्याचे मत आयुक्त गणेश देशमुख यांनी व्यक्त केले.
पनवेल महानगरपालिकेने जप्त केलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे योग्य रीतीने विघटन होणे गरजेचे आहे. याकरिता गो ग्रीन इन्विरोटेक या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. शास्त्रोक्तरीत्या प्लास्टिकचे विघटन केल्यास पर्यावरणाची हानी होणार नाही.
- डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका, पनवेल