पनवेल महापालिकेला हवे आहेत ४४ अधिकारी
By admin | Published: December 23, 2016 03:35 AM2016-12-23T03:35:46+5:302016-12-23T03:35:46+5:30
नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेची व्याप्ती मोठी आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या २९ गावांसह नगर परिषदेत
वैभव गायकर / पनवेल
नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेची व्याप्ती मोठी आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या २९ गावांसह नगर परिषदेत क्षेत्राची लोकसंख्या १0 लाखांच्या घरात आहे. त्या तुलनेत महापालिकेकडे अपुरे मनुष्यबळ आहे. महापालिकेचा कारभार गतिमान करण्याच्या दृष्टीने आणखी ४४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुमक मिळावी, अशी मागणी महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी नगरविकास विभागाकडे केली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्राची २0११ च्या जनगणनेनुसार ५ लाख ९0 हजार लोकसंख्या आहे. प्रत्यक्षात मात्र हा आकडा दहा लाखांच्या घरात तसेच महापालिकेचे क्षेत्रफळ १११0.0६ चौ. कि.मी. म्हणजेच शेजारच्या नवी मुंबई महापालिकेपेक्षा अधिक आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात २९ गावांसह नगरपरिषदेचे क्षेत्र, महाराष्ट्र औद्योगिक वसाहत, विशेष आर्थिक क्षेत्र, आंतरराष्ट्रीय विमानतळ आदींचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात लोकसंख्यावाढीचे प्रमाण जवळपास ७३ टक्के इतके आहे. या संपूर्ण क्षेत्राचा कारभार हाकण्यासाठी सक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांची अतिरिक्त फौज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. शिंदे यांनी १६ नोव्हेंबर रोजी नगरविकास विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून आणखी ४४ अधिकारी व कर्मचारी देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून या मागणीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
आवश्यक अधिकाऱ्यांची पदे
अतिरिक्त आयुक्त (२ ), उपायुक्त (७ ), मुख्य दक्षता अधिकारी (१ ), सहाय्यक आयुक्त (१३ ), मूल्य निर्धारक, कर संकलन अधिकारी (१ ), सहाय्यक मूल्य निर्धारक कर संकलन अधिकारी (१ ), महिला व बालविकास अधिकारी (१ ), समाज विकास अधिकारी (१ ), कायदा, विधी अधिकारी (१ ), सुरक्षा अधिकारी (१ ), सांख्यिकी अधिकारी (१ ), अधीक्षक (१ ), मुख्य लेखा अधिकारी (१), लेखा अधिकारी (१ ), मुख्य लेखा परीक्षक (१), सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी (१ ), पशू शल्य चिकित्सक, संबंधित अधिकारी (१ ), कार्यकारी अभियंता (२ ), उप अभियंता (४ ), उप अभियंता (पाणीपुरवठा) (१ ), सहाय्यक संचालक नगर रचना (१ ), सिस्टीम मॅनेजर, ई-प्रशासन (१), पर्यावरण संवर्धन अधिकारी (१ ), वैद्यकीय अधीक्षक (१ ), शिक्षणाधिकारी (१ ), प्रशासन अधिकारी शिक्षण मंडळ (२ ), मुख्य अग्निशमन अधिकारी (१), सहाय्यक अग्निशमन अधिकारी (१)