पनवेल महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांची होत आहे मनमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 06:15 AM2019-08-22T06:15:42+5:302019-08-22T06:15:52+5:30
पनवेल महानगर पालिकेच्या कृष्णाळे तलावाभोवती स्टेनलेस स्टीलचे रेलिंग बसविण्याचे काम करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती.
पनवेल : पनवेल महानगर पालिकेत भालचंद्र धारप या अभियंत्याची तक्र ार ठेकेदारांनी थेट पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. निविदा मागविताना थेट स्वत:च्या मर्जीतील ठेकेदाराला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप वास्तुशिल्प कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने केले आहे. यासंदर्भात लेखी पत्र आयुक्तांना दिले आहे.
पनवेल महानगर पालिकेच्या कृष्णाळे तलावाभोवती स्टेनलेस स्टीलचे रेलिंग बसविण्याचे काम करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. मात्र भालचंद्र धारप यांनी सर्व अटी शर्ती धाब्यावर बसवत स्वत:च्या मर्जीतील ठेकेदाराला काम दिल्याचा आरोप या कंत्राटदाराने केला आहे. विशेष म्हणजे आपल्या अधिकारातील तीन लाखपर्यंतची कामे स्वत:च्या मर्जीतील ठेकेदारांना दिली जात आहे. या कामाच्या माध्यमातून स्वत:च्या मर्जीतील ठेकेदाराकडून पैसे उकळण्यासाठी हा प्रकार सुरु आहे.
यावर्षीच जून महिन्यात फडके नाट्यगृहात बॅरेकेटिंग बसविण्याचे काम भालचंद्र धारप यांनी काढले होते, परंतु या कामासाठी इतर कोणाच्याही निविदा धारप यांनी स्वीकारल्या नाहीत. अनेक वेळा सामोरे जावे लागत असून आयुक्तांनी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी वास्तुशिल्प कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदारांनी केली आहे.
माझे काम मी प्रामाणिकपणे करीत असतो. मी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार काम करीत आहे. माझ्याविरोधात नेमकी काय तक्रार केली त्याबाबत मला अद्याप माहिती मिळाली नाही.
- भालचंद्र धारप, अभियंता,
पनवेल महानगर पालिका