पनवेल : महापालिका क्षेत्रातील सिडको नोडमधील कचरा उचलण्यास पालिकेने सोमवारपासून सुरु वात केली आहे. घनकचरा व्यवस्थापनातील ६८७ कामगारांपैकी ७८ कामगार पहिल्या दिवशी गैरहजर होते. खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा आदी ठिकाणच्या सिडको नोडमधून दररोज ३५० ते ४०० टन कचरा जमा होत असतो. या कचऱ्याची एकत्रित विल्हेवाट तळोजा येथील डंपिंग ग्राउंडवर लावली जाते.
पालिका हद्दीतील सिडको नोडमधील सर्व ठिकाणचा कचरा उचलण्याबाबत आयुक्त गणेश देशमुख यांनी विशेष सूचना संबंधित कंत्राटदाराला दिल्या होत्या. तसेच या व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेचे अधिकारी आयुक्त गणेश देशमुख यांनी नेमले आहेत. पहिल्या दिवशी सुरळीत कचरा उचलल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पालिका शहरात कोणत्याच ठिकाणी कचरा साचणार नाही याची पूर्णपणे खबरदारी आम्ही घेतली आहे. तशा सूचना संबंधित कंत्राटदाराला दिल्या गेल्या आहेत. तसेच या यंत्रणेवरील नेहमी उपस्थित असलेल्या कामगारांची नियमित नोंद आम्ही ठेवणार असून पहिल्या दिवशी ७८ कामगार गैरहजर असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.