पनवेल महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेची तारीख जाहीर; 20 जिल्ह्यात 11 सत्रात होणार परीक्षा
By वैभव गायकर | Published: October 27, 2023 03:11 PM2023-10-27T15:11:25+5:302023-10-27T15:11:47+5:30
परीक्षेबाबत खोट्या अफवा पसरविणाऱ्यांवरती महापालिकेच्यावतीने कायदेशीर कारवाई होणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे.
पनवेल:पनवेल महापालिकेच्यावतीने 41 संवर्गातील गट'अ' ते गट 'ड' मधील 377 रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रियेसाठीची परीक्षा येत्या 8,9, 10,11 डिसेंबरला 11 सत्रांमध्ये होणार आहे. ही परीक्षा पुर्णत: पारदर्शक होणार आहे. परीक्षेबाबत खोट्या अफवा पसरविणाऱ्यांवरती महापालिकेच्यावतीने कायदेशीर कारवाई होणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे.
पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर आस्थापनेवर प्रथमच होणाऱ्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला आहे. महापालिकेच्या भरती प्रक्रियेमध्ये 377 पदांसाठी एकुण 54 हजार 558 अर्ज अंतिमत: प्राप्त झाले आहेत.टीसीएस मार्फत हि भरती प्रक्रिया पार पडणार आहे.या भरती प्रक्रीयेमध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधि, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परीक्षण सेवा इत्यादी विभागांतील एकुण 377 पदांकरिता ही भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. येत्या 8, 9,10 11 डिसेंबरला 20 जिल्ह्यामध्ये विविध केंद्रावरती ही परीक्षा होणार आहे. भरती प्रक्रियेबाबत काही समाजकंटकाच्या माध्यमातून व्हॉटस्अपद्वारे खोटे एसएमएस पाठविले जात आहे. अशा समाजकंटकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेच्यावतीने पोलिस विभागास पत्र देण्यात येणार आहे. भरतीबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये. ही भरती प्रक्रिया पुर्णपणे पारदर्शक होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.
केंद्रांवर बसवणार जामर -
20 जिल्ह्यामध्ये विविध केद्रांवरती ही परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा पारदर्शी होण्याकरीता खबरदारीचे उपाय म्हणून प्रत्येक केंद्रावरती जामर बसविण्याची सोय पालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. जेणे करून उमेदवारांना मोबाईल, ब्लूटूथ ,डिजीटल वॉचेस इत्यादी साधनांचा वापर करून अनुचित प्रकार करता येणार नाही.
भरती प्रक्रिये संदर्भात कोणत्याही अधिकाऱ्याने ,पदाधिका-याने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रलोभन दाखविल्यास याबाबत त्यांचे विरुद्ध पुराव्यासह नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दाखल करावी . परीक्षेच्या बाबतीत कोणतीही शंका असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
- गणेश देशमुख (आयुक्त ,पनवेल महानगरपालिका)