पनवेल : प्लास्टिक जप्ती कारवाई दरम्यान पनवेल महापालिकेतील प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण झाली आहे. यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नसली, तरी महापालिकेच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.पनवेलमधील पटेल मोहल्ला या ठिकाणी काही हातगाडीवरील विक्रते प्लास्टिकच्या पिशवीतून वस्तू विक्री करत असल्याची महापालिकेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या गोष्टीचा राग धरून तेथील विक्रेत्यांनी श्रीराम हजारे व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला करून पालिकेच्या मालकीची बोलेरो गाडीची तोडफोड केली. या हल्ल्यात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र सरकारी कारवाईत अडथळा आणल्याने आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दिली आहे.यापूर्वी कळंबोली शहरात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यावर जीवघेना हल्ला करण्यात आला होता. संदीप खानावकर असे त्या कर्मचाऱ्याचे नाव होते. कचरा वर्गीकरणावरुन कॅप्टन हॉटेल मालकाशी झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचा आरोप खानावकर यांनी केला होता.