Panvel: व्यावसायिक मालमत्ता कर धारकापाठोपाठ औद्योगिक मालमत्ता धारकांना पनवेल मनपाच्या नोटिसा, कर वसुलीसाठी पालिकेची मोहीम तीव्र
By वैभव गायकर | Published: March 20, 2023 05:43 PM2023-03-20T17:43:31+5:302023-03-20T17:44:11+5:30
Panvel News: सिडको हद्दीतील अधिक मालमत्ता कर थकवलेल्या 1398 मालमत्ताधारकांबरोबरच तळोजा एमआयडीसी क्षेत्रातील अधिक मालमत्ता कर थकवलेल्या 100 मालमत्तांधारकांना महापालिकेच्यावतीने नोटिसा देण्यात आल्या आहेत.
- वैभव गायकर
पनवेल - सिडको हद्दीतील अधिक मालमत्ता कर थकवलेल्या 1398 मालमत्ताधारकांबरोबरच तळोजा एमआयडीसी क्षेत्रातील अधिक मालमत्ता कर थकवलेल्या 100 मालमत्तांधारकांना महापालिकेच्यावतीने नोटिसा देण्यात आल्या आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे महापालिकेने व्यवसायिक मालमत्ता करधारकांकडून थेट वसुलीची कारवाई सुरु केली आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सुमारे 100 उद्योजक मालमत्ता धारकांना मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पनवेल महापालिकेने नोटीसा दिल्या आहेत. एमआयडीसीमधील एकुण 10 हजार 25 मालमत्ताधारकांपैकी अधिक मालमत्ता कर थकवलेल्या 100 मालमत्तांधारकांना या नोटीसा देण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व्यवसायिक मालमत्ता करधारकांडून वसुलीची थेट कारवाई सुरु केली आहे. या वसुलीसाठी महापालिकेच्यावतीने 8 टिम केल्या आहेत. प्रभाग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या टिम सर्व प्रभागांमध्ये वसुलीसाठी जात आहे.
याचबरोबरीने मालमत्ता कर उपायुक्त गणेश शेटेही या टिमसोबत प्रत्यक्ष वसुलीच्या कामामध्ये सहभागी होत आहे. याचबरोबर मालमत्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त हरिश्चंद्र कडू यांनी दिलेल्या माहितीनूसार चारही प्रभागामंध्ये मार्च महिना संपेपर्यंत नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी शनिवार ,रविवार कार्यालये सुरू राहणार आहेत. जप्तीची कार्यवाही सुरू केल्यापासून 11 दिवसात साडे नऊ कोटींचा भरणा महापालिकेकडे जमा झालेला आहे.
मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा 2 टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढत आहे. याचबरोबर महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेचwww. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे.