पनवेल पालिका क्षेत्रात श्वान निर्बीजीकरणाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:19 AM2019-11-23T00:19:38+5:302019-11-23T00:19:48+5:30
निविदेला मंजुरी; स्थायी समितीत निर्णय
पनवेल : पनवेल पालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा विषय चांगलाच गाजला. या अनुषंगाने शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत निविदेला मंजुरी देण्यात आली आहे.
स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या वडिलांचे निधन झाल्याने प्रवीण पाटील यांच्या जागी प्रभारी सभापती म्हणून परेश ठाकूर यांनी काम पाहिले. या वेळी कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी केवळ एकच निविदा पालिकेला प्राप्त झाली होती. संबंधित इन डिफेन्स आॅफ अॅनिमल या कंत्राटदारामार्फत जादा दर आकारले जात असल्याने त्याच्या निविदा मंजुरीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, मध्यंतरी पनवेल परिसरात भटक्या कुत्र्यांनी थैमान घातल्याने लवकरात लवकर निर्बीजीकरणाची गरज लक्षात घेत शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समिती सभेत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. याकरिता प्रतिश्वान १३९० रुपये आकारणी ही संस्था करणार आहे.
पालिका क्षेत्रात सुमारे ५००० ते ५५०० भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. मागील वर्षभरापासून निर्बीजीकरण बंद असल्याने या संख्येत मोठी वाढ झाली आहे. निविदेला मंजुरी दिल्यानंतर लवकरात लवकर निर्बीजीकरणाला सुरुवात करण्याचे आदेश या वेळी प्रभारी सभापती परेश ठाकूर यांनी दिले.
नवीन पनवेल येथील पोदी स्मशानभूमीजवळ पालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. या ठिकाणी असलेल्या सात वेगवेगळ्या खोल्यामध्ये निर्बीजीकरण केले जाणार आहे. सभेत पालिकेचे लेखाधिकारी मनोजकुमार शेट्टे यांनी पनवेल महापालिकेचे बँक खाते पीएमसी बँकेतच का उघडले? याबाबतही चर्चा करण्यात आली.
भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निर्बीजीकरणासाठी मागविलेल्या निविदेला योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने ही निविदाप्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारच्या सभेत याबाबत निर्णय घेऊन निर्बीजीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरात लवकर निर्बीजीकरणाला सुरुवात होणार आहे.
- परेश ठाकूर, प्रभारी सभापती, स्थायी समिती, पनवेल महापालिका
असे करणार निर्बीजीकरण
कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाला आठवडाभरात सुरुवात होणार आहे. ज्या विभागात जास्त कुत्रे आहेत, याची तक्रार प्राप्त होताच संबंधित कंत्राटदारामार्फत कुत्र्यांना पकडून निर्बीजीकरण केंद्रात शस्त्रक्रियेसाठी दाखल केले जाईल. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा त्याच परिसरात कुत्र्यांना सोडले जाणार आहे. शस्त्रक्रिया झाल्यावर श्वानांवर एक खूण केली जाणार आहे.