पनवेल : राज्य शासनाने मिशन बिगिन अगेन म्हणत विविध प्रकारच्या बाजारपेठा, मॉल्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्राधिकरण म्हणून महानगरपालिकांना तशा प्रकारचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, मुंबई, नवी मुंबई महापालिकेने शहरातील मॉल्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु पनवेल महानगरपालिकेने मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पनवेलमध्ये मिशन बिगिन अगेन कधी सुरू होणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मागील चार महिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर करीत, विविध आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. मात्र, कोरोनासोबत लढताना परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली. महानगरपालिकांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार शासनाने दिल्यानंतर, मुंबई, नवी मुंबई महानगरपालिकेने मॉल्स सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. याच धर्तीवर पनवेल महानगरपालिकाही मॉल्स सुरू करून नागरिकांना एक प्रकारे दिलासा देईल, अशी नागरिकांची भावना झाली होती. मात्र, पनवेलमधील मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने नागरिकांमध्ये एक प्रकारे नाराजी पसरली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घेतली जाणारी खबरदारी, तसेच उपाययोजना या संदर्भात प्रत्येक जण योग्य ती काळजी घेत असतो. भविष्यात कोरोनासोबत जगायचे असल्याने, सर्व गोष्टीची खबरदारी घेऊनच मॉल्स, तसेच इतर दुकाने सुरू ठेवण्याची आवश्यकता असल्याचे पनवेलमधील नागरिक विशाल सिनारे यांचे म्हणणे आहे. मुंबई, नवी मुंबईमध्ये मॉल्स सुरू होत असताना पनवेलमध्ये बंद ठेवण्यामागे प्रशासनाचे काय धोरण आहे?सध्याच्या घडीला शहरातील इतर बाजारपेठा, व्यापारी मंडई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग योग्य पद्धतीने पाळले जात नाही. त्या तुलनेत मॉल्समध्ये सर्व खबरदारी घेतली जात असेल, तर नागरिकांच्या दृष्टीने सोईस्कर, तसेच सुरक्षित आहे. याबाबत प्रशासनाने विचार करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊननंतर रोजगाराचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर आणण्याची गरज आहे. पनवेलमधील ओरियन मॉलमध्येही तब्बल १,२०० कामगार विविध विभागांत कार्यरत आहेत. लॉकडाऊनच्या साडेचार महिन्यांपासून सर्वांचाच रोजगार थांबला असल्याने, हे कामगारही हवालदिल झाले आहेत.