पनवेल: मोटरसायकलला हातगाडी बांधून गरोदर महिलेचा जीव धोक्यात घालणारा प्रवास
By नारायण जाधव | Published: September 10, 2024 04:18 PM2024-09-10T16:18:35+5:302024-09-10T16:19:57+5:30
महानगरातील आरोग्यसेवेच्या ढिसाळ कारभारामुळे जनसामान्यांमध्ये संतापाची भावना
भालचंद्र जुमलेदार, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: महामुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल महापालिका क्षेत्रात डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्या डोंबारणीला प्रसवपीडा सुरू झाल्यानंतर रुग्णवाहिका न मिळाल्याने चक्क मोटरसायकलीला हातगाडी बांधून दवाखान्यात न्यावे लागण्याची घटना घडली. देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह महामुंबईतील नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबविली, उल्हासनगर या महानगरांच्या वेशीवर असलेल्या महानगरातील आरोग्यसेवेचा भाेंगळ कारभार यामुळे उघड झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आसूडगाव येथील डोंबारीचा खेळ करणाऱ्या गरोदर महिलेला सोमवारी रात्री प्रसवपिडा सुरू झाल्याने तिच्या नवऱ्याने माहितीतील आशा वर्करला फोन केला होता. त्यांनी ॲम्बुलन्ससाठी फोन नंबर दिला. परंतु, समोरच्या व्यक्तीने प्रतिसाद दिला नाही. यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काेणताही पर्याय नसल्याने त्याने मोटरसायकला हातगाडी तीत त्यात आपल्या गरोदर पत्नीला बसवून आसुडगाव ते उपजिल्हा रुग्णालय असा जीवघेणा प्रवास केला. त्यानंतर नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयामध्ये दाखल केले. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
पनवेलसारख्या महानगरानजीकच्या शहरातच ही गंभीर घटना घडल्याने राज्यासह स्थानिक आरोग्यसेवेचे पितळ उघडे पडले आहे. यामुळे स्थानिकांना तीव्र संताप व्यक्त करून लाडकी बहिण सारखी प्रसिद्धीभीमुख योजना आणण्यापेक्षा महिलाच्या आरोग्याकडे लक्ष द्या, अशी मागणी केली आहे