पनवेलला हवे ६५० एमएलडी पाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2016 01:43 AM2016-02-01T01:43:27+5:302016-02-01T01:43:27+5:30
प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेचा अहवाल जवळपास तयार झाला आहे. समितीने याकरिता विस्तृत सर्व्हे केला आहे. वाढती लोकवस्ती त्याचबरोबर पायाभूत सुविधांचाही आढावा घेण्यात आला आहे
वैभव गायकर, पनवेल
प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेचा अहवाल जवळपास तयार झाला आहे. समितीने याकरिता विस्तृत सर्व्हे केला आहे. वाढती लोकवस्ती त्याचबरोबर पायाभूत सुविधांचाही आढावा घेण्यात आला आहे. यात भविष्यात पनवेल महानगरपालिकेची तहान वाढणार असून दिवसाला प्रतिदिन ६५० एमएलडी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. या पाण्यासाठी बाळगंगा आणि हेटवणे धरणावर महापालिकेची मदार राहणार असून एमजेपी व एमआयडीसीकडूनही पाणी घ्यावे लागणार आहे.
पनवेल आणि सिडको वसाहतीतील लोकवस्ती जवळपास आठ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका व्हावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी वारंवार लावून धरली आहे. या संदर्भात विधानसभेत प्रश्नही उपस्थित केला होता. या व्यतिरिक्त पनवेल महापालिका व्हावी यासाठी चौका चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या सगळ्याचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली. या समितीने गेल्या काही दिवसात भौगोलिक स्थिती, कृषिक अकृषिक क्षेत्र,नगरपालिका, ग्रामपंचायतीचा महसूल, भौगोलिक व प्रशासकीय सलगता, लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ आदी गोष्टींचा अभ्यास करून अहवाल तयार केला आहे.
पनवेल शहर, सिडको वसाहती, नैना क्षेत्रातील गावांचा यामध्ये समावेश आहे. या ठिकाणी महापालिका झाल्यानंतर नेमके काय बदल होतील. त्याचबरोबर कोणत्या पायाभूत सुविधांची आवश्यकता भासणार आहे. याबाबत अहवाल तयार करण्यात आलेला आहे. यात महापालिका झाली तर पाण्याच्या आवश्यकतेबाबत आकडेवारी काढण्यात आलेली आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासणार असल्याचे अहवाल नमूद करण्यात आल्याचे समजते. त्याचबरोबर ही तहान भागविण्याकरिता कोणते कोणते पर्याय आहेत, याचीही चाचपणी करण्यात आलेली आहे.
कामोठे वसाहतीला नवी मुंबई महानगरपालिकेकडून तर खारघरला हेटवणे धरणातून पाणी दिले जाते. आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा योजना असल्या तरी त्या किती चालू आहेत, ही बाब संशोधनाची आहे. कित्येक गाव बोअरवेलवर अवलंबून आहेत. त्यामुळे जर महानगरपालिका झाली तर पाण्याचे नेमके काय नियोजन करावे लागेल याचा अभ्यासही समितीने केला असून यात पनवेल महापालिकेला प्रतिदिन ६५० एमएलडी पाण्याची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.