पनवेलला हवे पातळगंगेचे नियमित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 06:20 AM2018-04-27T06:20:24+5:302018-04-27T06:20:24+5:30
पालिकेच्या मालकीचे आप्पासाहेब वेदक (देहरंग) धरणदेखील आटले आहे.
पनवेल : पनवेल महानगरपालिकेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पातळगंगा नदीतील पाणी देण्यात येते. शनिवारी व रविवारी दोन दिवस टाटा पॉवर प्लांटमधून पाणी सोडण्यात येत नाही. यामुळे पनवेलकरांना तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत असून, नियमित पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी टाटा पॉवर प्लांटच्या प्रबंधकांकडे केली आहे. पनवेल शहरातील पाणीसमस्या खूपच गंभीर बनली आहे. अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.
पालिकेच्या मालकीचे आप्पासाहेब वेदक (देहरंग) धरणदेखील आटले आहे. त्यामुळे पालिकेला इतर संस्थांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे टाटा पॉवर प्लांटने यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्यास पालिकेतील पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटणार आहे. महापौर चौतमोल व पाणीपुरवठा सभापती नीलेश बाविस्कर यांनी या वेळी निवेदन सादर करून टाटा पॉवरचे प्रबंधक यांना दोन दिवस शटडाउन न घेण्याची विनंती केली आहे.