पनवेल-नवी मुंबईच्या वेशीवर नवे शहर, हिरानंदानी समूहाची टाऊनशिप
By नारायण जाधव | Published: May 16, 2023 04:19 PM2023-05-16T16:19:08+5:302023-05-16T16:19:23+5:30
प्रस्तावित नवी टाऊनशिप पनवेल तालुक्यातील बारवी, भोकरपाडा आणि खालापूर तालुक्यातील पाणशिल-तळेगाव या गावांच्या हद्दीतील १८९ हेक्टर अर्थात ४७२.५ एकर जमिनीवर बांधण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्हावा-शेवा-शिवडी सी-लिंक एकीकडे आकार घेत असताना दुसरीकडे देशातील बांधकाम व्यावसायिकांनी नवी मुंबई-पनवेल परिसरात मोठमोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. याच अंतर्गत आता निरंजन हिरानंदानी समूहाच्या परसिपिना डेव्हलपर्स कंपनीने पनवेल-नवी मुंबईच्या वेशीवर नवे शहर वसविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित नवी टाऊनशिप पनवेल तालुक्यातील बारवी, भोकरपाडा आणि खालापूर तालुक्यातील पाणशिल-तळेगाव या गावांच्या हद्दीतील १८९ हेक्टर अर्थात ४७२.५ एकर जमिनीवर बांधण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रस्तावित टाऊनशिपमध्ये परसिपिना डेव्हलपर्स कंपनी सुमारे १७,२३० कोटींची गुंतवणूक करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पर्यावरणविषयक मंजुरीसाठी राज्य परिवेश समितीने स्वीकारून तो आपल्या आगामी बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेसमोर ठेवला आहे. परिवेश समितीची मंजुरी मिळाल्यानंतर या नव्या शहराच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा दूर होणार आहे.
१७,२३० कोटींची गुंतवणूक
- परसिपिना डेव्हलपर्सच्या या टाऊनशिपमध्ये १७६.४० मीटर उंचीच्या १८२ इमारती बांधण्यात येणार आहेत.
- या इमारतींमध्ये ३३४५८ घरे बांधण्यात येणार असल्याचे कंपनीने याबाबतच्या प्रस्तावात म्हटले आहे.
- सुमारे १८९४०१० चौरस मीटर क्षेत्रावर ८२,८५,५९३.८१ चौरस मीटर इतके बांधकाम करण्यात येणार आहे.
३३ एमएलडी पाणी लागणार
या टाऊनशिपसाठी ३३ एमएलडी पाण्याची गरज भासणार आहे. मात्र, ही गरज महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण भागविणार असून सुरुवातीला बांधकाम सुरू असताना दररोज एक एमएलडी पाणी देण्याची तयारी प्राधिकरणाने दर्शविली असून तसे पत्रही दिले आहे.