पनवेल-पंढरपूर प्रवासी रेल्वे सेवा सुरू व्हावी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 07:50 PM2018-06-29T19:50:11+5:302018-06-29T19:53:22+5:30

पनवेल-पंढरपूर रेल्वे सेवा सुरू करावी अशी महत्वपूर्ण मागणी पनवेल संघर्ष समितीने रेल्वे मंत्री पियुश गोयल यांना पाठविल्या पत्रातून केली.

Panvel-Pandharpur passenger train service should be started | पनवेल-पंढरपूर प्रवासी रेल्वे सेवा सुरू व्हावी 

पनवेल-पंढरपूर प्रवासी रेल्वे सेवा सुरू व्हावी 

Next

पनवेल -महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या पंढरीच्या विठूरायचे दर्शन आणि गळाभेट घेण्यासाठी वैष्णव सदैव व्याकूळ असतात. पनवेल तालुक्यात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर असून त्यांना पंढरपूरला जाण्यासाठी सार्वजनिक प्रवासी व्यवस्था व्हावी म्हणून तात्काळ पनवेल-पंढरपूर रेल्वे सेवा सुरू करावी अशी महत्वपूर्ण मागणी पनवेल संघर्ष समितीने रेल्वे मंत्री पियुश गोयल यांना पाठविल्या पत्रातून केली. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी गोयल यांना ट्व्विट  केले आहे.
पनवेल तालुका आणि आजुबाजुच्या परिसरातून लाखो वारकरी वर्षभर पंढरीला जात असतात. राज्य परिवहन मंडळाची प्रवासी सेवा अपुरी आणि सोयीस्कर ठरत नसल्याने व्यापक प्रमाणात पंढरपूरला जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने व्यवस्था करणे उपयुक्त ठरणार असल्याने वारकरी संप्रदाय, भक्त आणि वैष्णव पंथाची ही फार जुनी मागणी आहे. त्यामुळे रेल्वे मंत्री आणि एक मुंबईकर म्हणून आपण महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताच्या भक्तांची हाक ऐकाल, अशी अपेक्षा कडू यांनी व्यक्त केली आहे. 
सध्या वारीचे दिवस सुरू झाले आहेत. वर्षानुवर्ष वारी करणारे काही वैष्णव वयोपरत्वे वयोवृध्द झाले आहेत. त्यांचे शरीर थकले असले तरी एकदा डोळे भरून विठूरायाला पाहण्याची आस त्यांना लागून राहिलेली आहे. ही त्यांची मनाची वारी पूर्ण करण्यासाठी पनवेल ते पंढरपूर रेल्वे सेवा अतिशय महत्वाची ठरणार आहे. पनवेल रेल्वे स्टेशनहून दररोज किमान एक हजार भक्त पंधरपूरला निश्चित रेल्वेने जाऊ शकतील. त्याशिवाय वर्षभर या प्रवासी सेवेला उत्तम प्रतिसाद लाभेल, असा विश्वासही गोयल यांना देवून ही सेवा लोकार्पण करण्याची संधी साधावी, अशी विनंती समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने कांतीलाल कडू यांनी केली आहे. 
वारीचे दिवस भारलेले असतात. सगळीकडून दिंड्या पंढरीच्या दिशेने कुच करतात. आरोग्य अथवा इतर काही कारणांनी वारीसेवा न करणाऱ्या वैष्णवांच्या मनाला त्यामुळे आघात पोहचतो. मनाला ते सल्य बोचत असते. त्यांच्या मन:स्थितीतीचा विचार करून त्यांना विठूरायाचा चरणस्पर्श व्हावा, वैकुंठरायाच्या मंदिराचे कळस दॄष्टीस पडावे, वैष्णवांची बहीण असलेल्या चंद्रभागेत स्नान करता यावे, ही माफक अपेक्षा ठेवून ते पंढरीच्या वाटेवर डोळे लावून असतात. त्यामुळे या रेल्वे सेवेचा विचार करणे उचित ठरेल, असा दावा कडू यांनी केला आहे.
याशिवाय सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अजमेर येथील शरिफ गरीब नवाज़ बाबा दर्ग्यास भेट देण्यास अथवा आशीर्वाद घेण्यासाठी नागरिक पनवेलहून सतत मिळेल त्या वाहनांतून जात आहेत. त्यांचा सुखरूप आणि सुरक्षित प्रवास व्हावा म्हणून पनवेल ते अजमेर रेल्वे सेवेसाठी त्या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करून सहकार्य करावे, अशी संयुक्तपणे मागणी कांतीलाल कडू यांनी केली आहे.
पनवेल ते पंढरपूर आणि पनवेल ते अजमेर ही महाराष्ट्राच्या जनतेची दोन्ही श्रध्दास्थाने आहेत. अध्यात्मिक विभूती किंवा प्रचिती देणारी पवित्र स्थाने असल्याने रेल्वे मंत्री या नात्याने पनवेलच्या एकात्मिकतेची श्रध्दा अखंडित रहावी यांकरीता दोन्ही मार्गावर पनवेलपासून सार्वजनिक प्रवासी सेवा सुरू करावी अशी कळकळीची मागणी कडू यांनी केली आहे.

Web Title: Panvel-Pandharpur passenger train service should be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.