- वैभव गायकरपनवेल : पनवेल शहरात स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय असावे याकरिता खासदार श्रीरंग बारणे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा करून ते मंजूर करून घेतले. मात्र, पोस्ट आॅफिस कार्यालयाकडून जागा देण्याबाबत क्षेत्रीय पासपोर्ट अधिकाऱ्यांना अद्याप सिग्नल मिळाला नसल्याने पनवेल पासपोर्ट कार्यालय सुमारे वर्षभर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळे पनवेल तालुक्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे .परराष्ट्र मंत्रालयामार्फत नवी मुंबई, पनवेल या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र पासपोर्ट कार्यालये सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, जागेअभावी दोन्ही ठिकाणची कार्यालये लांबणीवर पडली आहेत. नवी मुंबई, पनवेलसह रायगड जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट आॅनलाइन प्रक्रि या पूर्ण झाल्यानंतर ठाणे कार्यालय गाठावे लागते. नियोजित वेळेवर पोहचणे हे पासपोर्ट अर्जदारांसाठी जिकिरीचे असते. अशा वेळी वाहतूककोंडी आदींसारखी समस्या उद्भवल्यास संबंधित व्यक्तीला त्याठिकाणी पोहचणे शक्य होत नाही. अशावेळी सर्व प्रक्रि या नव्याने पार पाडावी लागते. याकरिताच पनवेल शहरात नव्याने पासपोर्ट कार्यालय सुरू होणार यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण होते. मात्र पोस्ट कार्यालय संबंधित जागा देण्यास उदासीन असल्याने सध्याच्या घडीला पनवेलमधील नागरिकांना स्वतंत्र पासपोर्ट कार्यालयासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे.नवीन पनवेल येथील पोस्ट आॅफिसमध्ये हे पासपोर्ट कार्यालय सुरू होते. जागा निश्चित करण्यात आली होती. तसे पत्र पासपोर्टचे मुंबई क्षेत्रीय कार्यालयानेही पनवेलच्या पोस्ट कार्यालयाला पाठविले होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीनुसार पोस्ट कार्यालयाने जागेचे कारण दाखवत पासपोर्ट कार्यालयाला जागा देण्यास नकार दिल्याचे समजते. खासदार बारणे यांना देखील मुंबई क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे.जागेअभावी पनवेल पासपोर्ट कार्यालय नवीन पनवेल पोस्ट कार्यालयात सुरू करण्यास पोस्ट कार्यालयाने नकार दिल्याचे समजते. मात्र, यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून पनवेल पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यास प्रयत्नशील राहीन. - श्रीरंग बारणे, खासदार, मावळ लोकसभा मतदार संघसंबंधित विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. यासंदर्भात खासदार बारणे हेदेखील प्रयत्नशील आहेत. पनवेल पासपोर्ट कार्यालय सुरू होण्यास कोणत्या अडचणी आहेत, याबाबत माहिती घेतो. पनवेलमध्ये पासपोर्ट कार्यालय व्हावे म्हणून निश्चितच मी प्रयत्नशील राहीन.- प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल विधानसभाजागेअभावी पनवेल, तसेच नवी मुंबई येथील दोन्ही पासपोर्ट कार्यालये रखडली आहेत. पोस्ट कार्यालयामार्फत आम्हाला जागा मिळाल्यास लवकरात लवकर पासपोर्ट कार्यालय सुरू करता येईल.- डॉ. स्वाती कुलकर्णी, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी, मुंबई
पनवेल पासपोर्ट कार्यालय लांबणीवर; जागा उपलब्ध करण्यास प्रशासनास अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 3:12 AM