पनवेल : पनवेल पोस्ट कार्यालय स्थलांतर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शहरवासीयांची गैरसोय होत आहे. मागील वर्षभरापासून या विषयावर सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, ज्येष्ठ नागरिक लढा देत आहेत. मात्र पोस्ट खात्याच्या वेळकाढू धोरणामुळे ही प्रक्रिया आणखीनच लांबणीवर पडली आहे. मात्र खासदार श्रीरंग बारणे यांच्या मध्यस्थीने काही पोस्ट कार्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जीर्ण झालेल्या इमारतीत मागील अनेक वर्षांपासून शहरातील पोस्ट आॅफिस सुरू होते. ही इमारत पालिकेने धोकादायक इमारत देखील घोषित केली होती. सदर इमारतीचा मालक व पोस्ट खात्याच्या वादामुळे हे पोस्ट कार्यालय नवीन पनवेल याठिकाणी स्थलांतरित झाले. यामुळे संपूर्ण पनवेल शहरातील नागरिकांना पोस्ट खात्याच्या संबंधित कामासाठी थेट नवीन पनवेल गाठावे लागते. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी हा प्रवास जिकिरीचा आहे. तसेच नवीन पनवेल कार्यालय गाठण्यासाठी हा प्रवास रिक्षाने खर्चीक आहे. अशा परिस्थितीत पनवेल शहरात पोस्ट कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे पनवेलमध्ये बुधवारी आले होते. त्यांना यासंदर्भात सेनेचे महानगर संघटक प्रथमेश सोमण यांनी माहिती देताच त्यांनी नवीन पनवेल पोस्ट कार्यालय गाठत तेथील पोस्टाचे अधिकारी अजय सिंग यांची भेट घेतली. त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केल्यानंतर पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याशी देखील दूरध्वनीवरून संपर्क साधला. पनवेल महानगर पालिकेच्या मालकीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये हे पोस्ट आॅफिस कार्यालय सुरु होणार आहे. याकरिता पोस्ट व पालिकेत करार होणार आहे.यासंदर्भात आयुक्त गणेश देशमुख यांनी पोस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पोस्ट खात्याने लवकरच हे कार्यालय सुरू होईल असे आश्वासन यावेळी दिले.काही पोस्ट कार्यालय सुरु होण्याचा मार्ग मोकळा.पनवेल महानगर पालिकेच्या मालकीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये हे पोस्ट आॅफिस सुरू होणार आहे. याकरिता पोस्ट व पालिकेत करार होणार आहे.
पनवेल पोस्ट कार्यालय होणार सुरू, टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 11:18 PM