पावसाळी पर्यटनासाठी पनवेलला पसंती; कलावंतीन, प्रबळसह इरशाळगडाचेही आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 12:23 AM2019-08-18T00:23:00+5:302019-08-18T00:24:01+5:30
राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश होत आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून पनवेल परिसरामधील पर्यटनस्थळांवरील गर्दी वाढली आहे. कर्नाळा किल्ला व अभयारण्याला रविवारी दोन ते तीन हजार पर्यटक भेट देत आहेत. कलावंतीन दुर्ग व प्रबळगडावरील गर्दीही वाढत असून याच परिसरातील इरशाळगडालाही ट्रेकर्सची पसंती मिळत आहे. या परिसरातील धबधबेही मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश होत आहे. गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव व विस्तीर्ण समुद्रकिनारा यामुळे राज्यातील व देशभरातून पर्यटक या ठिकाणी येत आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासूनरविवार व सुट्टीच्या दिवशी मुंबई, ठाणे व नवी मुंबईमधील पर्यटक पनवेलमधील पर्यटनस्थळांवर गर्दी करू लागले आहेत. सर्वाधिक गर्दी कर्नाळा किल्ला व अभयारण्यामध्ये होत आहे. मुंबई-गोवा महामार्गाला लागून असल्यामुळे व निसर्गाचे वरदान लाभल्यामुळे या ठिकाणाला पसंती मिळू लागली आहे. बहुतांश पर्यटक पनवेलवरून एसटी बसने कर्नाळाला जात आहेत. १२ चौरस किलोमीटर क्षेत्रावरील अभयारण्यामध्ये तब्बल ६४२ प्रकारचे वृक्ष, १३४ स्थानिक व ३८ प्रकारचे स्थलांतरित पक्षी असल्यामुळे पक्षिनिरीक्षकही मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत. कर्नाळा किल्ला पाहण्यासाठीही गर्दी होत आहे. समुद्रसपाटीपासून ४४५ मीटर उंचीवर असलेल्या किल्ल्यावरील अंगठ्याच्या आकाराचा सुळका व पुरातन वास्तूचे अवशेष पाहावयास मिळत असल्यामुळे दुर्गप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत. वनविभागानेही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा अनंतराव फडके हे कर्नाळाचे किल्लेदार होते. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभल्यामुळे इतिहासप्रेमींमध्ये या ठिकाणाची विशेष ओढ आहे.
कर्नाळानंतर सर्वाधिक गर्दी कलावंतीन व प्रबळगड किल्ल्यावर होत आहे. कलावंतीन दुर्गचा सुळका देश- विदेशातील ट्रेकर्सला आकर्षित करत आहे. कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या चढून गडावर जाणे आव्हानात्मक आहे. यामुळे एकदातरी कलावंतीनच्या अवघड पायºया चढून गडावर जायचे अशी इच्छा राज्यभरातील ट्रेकर्सची असते. यामुळे प्रत्येक रविवारी राज्याच्या कानाकोपºयातून नागरिक या ठिकाणी येत असतात. कलावंतीन सुळक्याचे दृश्य कॅमेराबद्ध करण्यासाठी प्रबळगडावर जाणे आवश्यक असते. यामुळे या ठिकाणी येणारे पर्यटक एकाच दिवशी दोन्ही किल्ल्यांना भेटी देत असतात. याच परिसरामध्ये मोरबे धरणाजवळ इरशाळगड आहे. माथेरानच्या रांगेतील या कि ल्ल्याला भेट देणाºया पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे. कर्नाळा, कलावंतीन दुर्ग, प्रबळगड व इरशाळगडावर प्रत्येक आठवड्याला दहा हजारांपेक्षा जास्त पर्यटक भेट देऊ लागल्यामुळे या परिसरातील पर्यटन व्यवसायालाही चालना मिळू लागली आहे.
कर्नाळा किल्ला
कर्नाळा किल्ला पाहण्यासाठीही पर्यटक गर्दी करू लागले आहेत. समुद्रसपाटीपासून ४४५ मीटर उंचीवर किल्ला आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा कर्नाळ्याचे किल्लेदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये हा किल्ला जिंकला. पुरंदरच्या तहामध्ये तो मोघलांच्या ताब्यात देण्यात आला. १६७० मध्ये तो पुन्हा मराठा साम्राज्यात परत आला आहे. महामार्गावरून जाताना किल्ल्याचा सर्वात वरील सुळका पर्यटकांना आकर्षित करत आहे. किल्ल्याच्या पायथ्याचे पाणवटे व रानवाटांमधून किल्ल्यापर्यंत जाण्याचा मार्ग पर्यटकांना आकर्षित करतो.
कर्नाळा अभयारण्य
मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. १२ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या अभयारण्यात ६४२ प्रजातींचे वृक्ष आहेत, तर तब्बल १३४ प्रजातींचे स्थानिक व ३८ स्थलांतरित पक्षी पाहावयास मिळत आहेत. १९६८ मध्ये शासनाने हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित केला असून, प्रत्येक वर्षी ८० ते ९० हजार पर्यटक या परिसराला भेट देत आहेत.
प्रबळगडाचा इतिहास
१४९० - बहमनी साम्राज्याचे तुकडे झाल्यावर किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीत आला.
१६३६ - शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ व शिवाजी महाराजांचे किल्ल्यावर वास्तव्य
१६५७ - छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर कोकण, कल्याण भिवंडी प्रांत व तेथील किल्ले काबीज केले. मोहिमेमध्ये महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीतील प्रबळगड, प्रधानगड, चौल, तळागड, घोसाळगड हे किल्ले जिंकले. स्वराज्याचे सरदार आबाजी महादेव यांनी हा प्रांत स्वराज्यात आणला.
१६६५ - पुरंदरच्या तहामध्ये २३ किल्ले मोघलांना देण्यात आले, त्यामध्ये प्रबळगडाचा समावेश होता. तह मोडल्यानंतर पुन्हा हा किल्ला स्वराज्यात आला.
१६८९ - मोघलांनी छापा टाकून मध्यरात्री हा किल्ला ताब्यात घेतला; परंतु नंतर लगेचच तो पुन्हा मराठ्यांनी जिंकला.
१८१८ - प्रबळगड इंग्रजांच्या ताब्यात आला. त्यांनी किल्ल्यावरील वास्तू पाडून टाकल्या.
कर्नाळा अभयारण्य व कर्नाळा किल्ल्यावर येणाºया पर्यटकांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. किल्ल्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उपाययोजना केल्या आहेत.
- प्रदीप चव्हाण,
वनपरिक्षेत्र अधिकारी
कलावंतीन दुर्ग व प्रबळगडावर पर्यटकांना माहिती देता यावी, यासाठी वनसमिती स्थापन केली आहे. या परिसरात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
- नंदकिशोर कुप्ते,
सहायक वनसंरक्षक,
पनवेल