- कमलाकर कांबळे नवी मुंबई : पनवेल रेल्वेस्थानकाचा मेकओव्हर केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळासह या परिसरात येऊ घातलेल्या विविध प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर या स्थानकाला वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे. सीएसएमटी ते पनवेल स्थानकापर्यंत कॉरिडोर प्रस्तावित आहे. या स्थानकाला हायटेक करण्याचा निर्णय सिडको व मध्य रेल्वेने घेतला आहे. त्या संबंधीचा आराखडाही तयार करण्यात आला असून, लोकसभा निवडणुकीनंतर त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली जाणार आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिडकोचा ‘नैना’ प्रकल्प, मेट्रोचे जाळे, जेएनपीटीचा विस्तार तसेच शिवडी-न्हावाशिवा सी-लिंक व नेरुळ-उरण रेल्वे आदीमुळे रायगड जिल्ह्याला महत्त्व प्राप्त होणार आहे. भविष्यात रायगडच्या विकासाचा केंद्रबिंदू पनवेल ठरणार आहे. सध्याच्या पनवेल स्थानकातून अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या सुटतात, त्यामुळे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असते. भविष्यात या स्थानकांवर ताण वाढण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर काळाची गरज म्हणून पनवेल स्थानकाचा मेकओव्हर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसा प्रस्ताव मध्य रेल्वेला सादर करण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या मान्यतेनंतर स्थानकाच्या विस्तारीकरणाचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. सीएसएमटीच्या पार्श्वभूमीवर या स्थानकाचा विकास करण्याची योजना आहे. पनवेल आणि परिसराचा भविष्यकालीन विकास व विस्तार लक्षात घेवून या स्थानकात अत्याधुनिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. निवडणुका पार पडताच या कामाला प्रत्यक्षात सुरूवात केली जाणार आहे. या कामासाठी सध्या सुमारे अडीचशे कोटी रूपये खर्च निर्धारित करण्यात आला आहे. गरजेनुसार त्यात वाढ करण्यात येणार आहे. या प्रकल्पात सिडकोचा ६७ टक्के तर रेल्वेचा ३३ टक्के सहभाग असणार आहे.फलाटांची संख्या वाढणारपनवेल स्थानक मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावर आहे. कोकण मार्गे जाणाऱ्या सर्व लांबपल्ल्याच्या गाड्या या स्थानकात थांबतात. मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस तसेच विदर्भ, मराठवड्यात जाणाºया सर्व गाड्यांचा या स्थानकात थांबा आहे. या स्थानकात एकूण सात फलाट असून, त्यापैकी चार उपनगरीय तर तीन लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी आहेत. यात आणखी तीन फलाटांची वाढ करून सोयीसुविधांचा विस्तार केला जाणार आहे.अडीच हजार कोटी खर्चाचा सीएसटी-पनवेल कॉरिडोरआंतरराष्ट्रीय विमातळाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण यंत्रणा सक्षम करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. मुंबईहून नवी मुंबई विमानतळापर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचता यावे, या दृष्टीने मेट्रो, रेल्वे रस्ते व जलवाहतुकीचे जाळे विणले जात आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल स्थानकापर्यंत कॉरिडोर तयार केला जाणार आहे. त्यासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च निर्धारित केला आहे.रेल्वे उचलणार झोपड्यांच्या पुनर्वसनाचा भारपनवेल स्थानक परिसरात सुमारे ८५० झोपड्या आहेत. या झोपड्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने सिडको व मध्य रेल्वेने संयुक्त अहवाल तयार केला आहे. पुनर्वसनासाठी एमएमआरडीएच्या रेंटल हाउसिंग योजनेतील घरे मिळवून देण्याची तयारी सिडकोने दर्शविली आहे; परंतु त्याचा खर्च रेल्वेला उचलायचा असून रेल्वेने प्रस्तावाला मान्यता दिल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.
पनवेल रेल्वे स्थानकाचा होणार हायटेक विस्तार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 1:22 AM