नवी मुंबईसह पनवेलमध्ये यंत्रणा सज्ज; शहरामध्ये कडक बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 01:32 AM2019-04-27T01:32:29+5:302019-04-27T01:33:01+5:30
नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन : मतदान केंद्रांमधील सुविधांचाही आढावा
नवी मुंबई : पनवेल, उरण व नवी मुंबई परिसरामधील मतदान सुरळीत व शांततेमध्ये पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सर्व मतदान केंद्रांमधील सुविधांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. शहरामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, विविध ठिकाणी रूटमार्च काढण्यास सुरुवात केली आहे. सुट्टीचा आनंद जरूर घ्या; पण प्रथम मतदान करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नवी मुंबईमध्ये ठाणे मतदारसंघामधील ऐरोली व बेलापूर हे दोन विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्र येत आहे. मावळ मतदारसंघामधील कर्जत, पनवेल व उरण हे तीन विधानसभेचे मतदारसंघ या परिसरामध्ये आहेत. दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. ठाणे मतदारसंघामधील २३ लाख ६७ हजार मतदानापैकी नवी मुंबई परिसरामध्ये आठ लाख २४ हजार मतदार आहेत.
मावळमधील २२ लाख २७ हजार मतदानापैकी रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रामध्ये तब्बल ११ लाख नऊ हजार मतदान आहे. दोन्ही लोकसभा क्षेत्रामधील तब्बल १९ लाखांपेक्षा जास्त मतदान या परिसरामध्ये आहे. पनवेल, उरण व कर्जत परिसरामध्ये १२६६ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये तीन सखी मतदान केंद्र असणार आहेत. पनवेलमधील मतदान केंद्र क्रमांक ३४४, कर्जतमधील ८ व उरणमधील ११ क्रमांकाच्या केंद्रामध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी महिला असणार आहेत. तीनही ठिकाणी पनवेल व उरणमधील १३ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यामधील सात केंदे्र ही खारघर परिसरामधील आहेत. उरण परिसरातील गव्हाण येथील पाच केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.
रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रासाठी २९१६ बॅलेट युनिट्स असणार आहेत. त्यामध्ये १४५४ कंट्रोल युनिट्स व १५६८ व्हीव्हीपॅट असणार आहेत. ही मतदान यंत्रे ने-आण करणाऱ्या वाहनांवर जीपीएसद्वारे सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जीपीएस मॉनिटरिंग कक्ष कार्यान्वित केला आहे. तब्बल १३२ ठिकाणांवरून वेब कास्टिंग केले जाणार आहे. यामध्ये पनवेलमधील ५८, उरणमधील ३९ व कर्जतमधील ३५ मतदान केंद्रांचा समावेश आहे.
मतदानासाठी आवश्यक कागदपत्रे
मतदान ओळखपत्र नसले तरी मतदान करता येणार आहे. मतदारयादीमध्ये नाव असलेल्या नागरिकांनी पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक, आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र, जनगणना आयुक्तांनी दिलेले ओळखपत्र, रोजगार हमी योजनेमधील जॉब कार्ड, कामगार मंत्रालयाकडील आरोग्य कार्ड, निवृत्त कर्मचाºयांचे पेन्शन पासबुक, पेन्शन पेमेंट आॅर्डर, आधार कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे.
महापालिकेचीही जय्यत तयारी
नवी मुंबईमधील बेलापूर मतदारसंघामध्ये चार लाख ४८ हजार ६८१ मतदार आहेत. ७२ इमारतींमधील ४५२ मतदान केंद्र असणार आहेत. बेलापूर मतदारसंघामध्ये तीन लाख ७६ हजार मतदार असून, येथे ५५ इमारतींमध्ये ३८६ मतदान केंद्रे असणार आहेत. महापालिकेने दोन सखी मतदान केंद्रे तयार केली आहेत. दिव्यांग नागरिकांसाठी १२ सुविधा केंद्रे तयार केली आहेत.
प्रशासनाचे मतदारांना आवाहन
मावळ व ठाणे मतदारसंघामध्ये २९ एप्रिलला मतदान होत आहे. चौथा शनिवार व रविवारमुळे दोन दिवस सुट्टी आहे. २९ तारखेला मतदानाची सुट्टी असून, ३० एप्रिलचा अपवाद सोडल्यास १ मे रोजी पुन्हा सुट्टी आहे. सलग सुट्टींमुळे मुंबईमधील चाकरमानी व नोकरदारवर्ग सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गावी व पर्यटनासाठी बाहेर पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी मतदानास प्राधान्य द्यावे.
कर्मचाºयांना प्रशिक्षण : मावळ मतदारसंघामधील रायगड जिल्ह्यात येणाºया कार्यक्षेत्रासाठी ५५९२ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. प्रत्येक केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, एक प्रथम मतदान अधिकारी, दोन इतर मतदान अधिकारी, असे एकूण चार मतदान अधिकारी असणार आहेत. सर्व मतदान केंद्रासाठी दहा टक्के राखीव मतदान अधिकारी असणार आहेत.
पथकांची करडी नजर : पनवेल, उरण व कर्जत परिसरासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या परिसरामध्ये १३ स्थिर सर्वेक्षण पथके, २२ भरारी पथके, चार व्हिडीओ सर्वेक्षण पथके, १८ सूक्ष्म निरीक्षक, १३५ झोनल अधिकारी तैनात करण्यात आले असून, आचारसंहिता भंग होणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जाणार आहे.
पोलीस यंत्रणाही दक्ष : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामधील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. महामार्गासह सर्व ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाºयांना हद्दपार केले जात आहे. नवी मुंबईसह पनवेलमध्ये रूटमार्च काढण्यात येत आहे. निवडणूक दरम्यान कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.