पनवेल ते बेलापूर : २५ रुपयांच्या प्रवासासाठी ३०० रुपयांची वसुली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 05:16 AM2023-10-03T05:16:38+5:302023-10-03T05:16:52+5:30
इको, रिक्षाचालकांकडून लूट, रेल्वेच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल
अरुणकुमार मेहेत्रे
कळंबोली : लोकलच्या हार्बर मार्गावरील दोन दिवसांच्या मेगाब्लॉकमुळे सोमवारीसुद्धा प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. रविवारी मेगाब्लॉक तसेच मालगाडी रुळांवरून घसरल्याने दुहेरी संकटामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. रविवारसह सोमवारी जैसे थे परिस्थिती असल्याने रिक्षाचालकांनी प्रवाशांची अडवणूक करून पंधरा किमीसाठी २५० ते ३०० रुपयांची मागणी करत जादा पैसे उकळले.
सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत रेल्वेचा मेगाब्लॉक घेतला होता. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त सुट्टी असली तरी गावी जाणारे तसेच गावाकडून मुंबई गाठणाऱ्या प्रवाशांना या मेगाब्लॉकमुळे नाहक त्रास सहन करावा लागला.
सोमवारी सकाळपासूनच एसटी बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी गर्दी केली होती. त्याचबरोबर सीबीडी बेलापूरपासून मुंबईसह ठाणे जाण्यासाठी लोकल सेवा सुरळीत सुरू होती. मात्र, पनवेल ते सीबीडी बेलापूरपर्यंतची लोकल वाहतूकबंद केल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
इको चालकांचाही धंदा तेजीत
सोमवारी सकाळपासूनच इको चालकांचा मोर्चा सीबीडी बेलापूरकडे वळवला होता.
मुंब्रा, कल्याण चालणाऱ्या इको सीबीडी बेलापूरपर्यंत प्रवासी भाडे आकारले.
त्यात प्रवाशांकडून जास्तीचे पैसे घेतल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलाच भुर्दंड सोसावा लागला.
मेगाब्लॉकमुळे सीबीडी बेलापूरपर्यंत रिक्षाचालक २५० ते ३०० रुपये
घेत आहे. अडवणूक करून जास्तीचे पैसे उकळण्याचा प्रकार सुरू आहे. याकडे वाहतूक पोलिस लक्ष देत नाहीत. त्यामुळे रिक्षाचालकांचे दोन दिवस फावले आहे. याचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सोसावा लागला. - अनिल पाटील, प्रवासी
सोमवारी सकाळी पनवेल बसस्थानकातही प्रचंड गर्दी झाली होती. गाड्या खचाखच भरल्या जात होत्या. त्यामुळे प्रवास करणे कठीण झाले होते. त्यात खासगी वाहनांकडून अडवणूक करत जादा पैशांची मागणी करण्यात आली. रिक्षाचालकाकडून ३०० रुपये घेतले जात होते. अशी अडवणूक चुकीची आहे.
- अमोल साळुंखे, प्रवासी
एसटीने २५ रुपयांत सीबीडी बेलापूर गाठता येत होते. मात्र, गर्दीमुळे खासगी वाहनांचा अनेकांना आधार घ्यावा लागला.
लोकल सेवा प्रभावित झाल्याने सोमवारी लेकुरवाळ्या महिला आणि ज्येष्ठांचे प्रचंड हाल झाले. पनवेलमधून ठाणे आणि दादरला जाण्यासाठी अनेकांनी एसटी महामंडळाच्या बसेसचा आधार घेतला.
त्यामुळे त्यांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागले. बसेस क्षमतेपेक्षा अधिक भरून जात असल्याने अनेकांना जीवघेणी कसरत करत उभ्यानेच तब्बल दीड तासाचा प्रवास करावा लागला.
मर्यादित बसेस आणि बेसुमार गर्दीचा फायदा घेत रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांची अक्षरश: लूट केली.
बेलापूर स्थानकापासून पनवेलपर्यंत बसेस सोडण्यात येत असल्या तरी गर्दीच्या तुलनेत बसेसची संख्या कमी होती. त्यामुळे बसमध्ये प्रवासी कोंबले होते. नागरिकांना तसाच प्रवास करावा लागला. अनेक बसेस या जुन्या असल्याने खिळखिळ्या झाल्या आहेत. शनिवारी आणि रविवारी रात्री काही बसेस रस्त्यात नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.