वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क
पनवेल: केंद्र शासनामार्फत ‘स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्ताने' आयोजित केलेल्या खारघरमध्ये सायकल रॅली, कळंबोली, पनवेलमध्ये पदयात्रा आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते.या रॅलीला तरुणांचा उदंड प्रतिसाद मिळाला.केंद्र शासनामार्फत ‘स्वच्छ अमृत महोत्सव' 17सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान पनवेल महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग’स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग’स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या स्वछतेमध्ये तरूणांचा सहभाग वाढवा , शहराशी आपुलकीचे नाते निर्माण व्हावे दृष्टीने या उपक्रमांनिमित्ताने आज (दिनांक 17 सप्टेंबर) खारघरमध्ये सायकल रॅली, कळंबोली, पनवेलमध्ये पदयात्राचे आयोजन करण्यात आले होते.
‘इंडियन स्वच्छता लीगच्या’ रॅलीमध्ये विविध महाविद्यालये,शाळा,विविध पर्यावरण संघटना, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे ‘स्वच्छ भारत’ अभियानाची पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये प्रभावी अमंलबजावणी सुरु आहे. केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘इंडियन स्वच्छता लीग’ उपक्रमांतर्गत पनवेल महानगरपालिकेने आपली ‘पनवेल चॅम्पियन्स’ ही टिम तयार केली आहे. 19 वर्षाखालील गटातील जागतिक मानांकनामध्ये 4था क्रमांक प्राप्त करणारी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष ही या टिमची कॅप्टन आहे.पनवेल महापालिका मुख्यालय ते वडाळे तलाव पदयात्रेस आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख,माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे,पनवेलमधील प्रसिध्द आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष,उपायुक्त सचिन पवार, लेखा परिक्षक निलेश नलावडे,सहाय्यक आयुक्त डाॅ.वैभव विधाते, माजी नगरसेवक,नगरसेविका उपस्थित होत्या.पनवेल प्रभागामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयापासून या रॅलीची सुरुवात झाली.
या रॅली मध्ये सुमारे साडेतीन हजार महाविद्यालयीन तरुण-तरुणी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी सहभाग घेतला. उपस्थितांना महानगरपालिकेमार्फत इंडियन स्वच्छता लीग चा लोगो असणारा टी-शर्ट, टोपी ,विशेष बिल्ला यांचे वाटप करण्यात आले या पाय रॅलीमध्ये विद्यार्थी व उपस्थितांच्या हातामध्ये स्वच्छतेचा संदेश देणारे फलक व इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेले विशेष झेंडे यामुळे ही रॅली खूपच खुलून दिसत होती. या रॅलीची सांगता ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या वडाळे तलाव येथे झाली. या ठिकाणी सर्व उपस्थितांनी एकत्रितरित्या राष्ट्रगीताचे गायन केले. या रॅली च्या पार्श्वभूमीवर वडाळे तलावावरती सेल्फी पॉईंट ची निर्मिती महापालिकेमार्फत करण्यात आली होती. याचा सुद्धा आनंद अनेक उपस्थितांनी घेतला.
खारघर प्रभागामध्ये उपायुक्त विठ्ठल डाके आणि उपायुक्त गणेश शेटे यांच्या उपस्थितीत उत्सव चौक ते गुरूद्वार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीस तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सायकल रॅली मध्ये सुमारे दीड हजार नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. कळंबोली प्रभागात उपायुक्त कैलास गावडे आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे यांच्या उपस्थितीत कळंंबोलीमध्ये बस डेपो ते एम जी एम रुग्णालय, कळंबोली पोस्ट ऑफिस मार्गे पुन्हा बस डेपो येथे सांगता करण्यात आली या पायी रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थी व नागरिकांनी रॅलीच्या सुरुवातीला स्वच्छतेची शपथ घेतली. यामध्ये जवळपास अडीच हजार शालेय विद्यार्थी आणि तरुणांनी सहभाग घेतला.