पनवेलकरांना मिळणार कोंढाणातून पाणी
By admin | Published: April 9, 2017 03:00 AM2017-04-09T03:00:11+5:302017-04-09T03:00:11+5:30
सिडकोच्या माध्यमातून कोंढाणा धरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात नैना क्षेत्राची तहान भागविण्यासाठी हे धरण उपयुक्त ठरणार आहे.
पनवेल : सिडकोच्या माध्यमातून कोंढाणा धरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात नैना क्षेत्राची तहान भागविण्यासाठी हे धरण उपयुक्त ठरणार आहे. तसेच पनवेलकरांनाही त्यातून अतिरिक्त पाणीपुरवठा होऊ शकेल, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.
पनवेल तालुक्यातील विचुंबे, देवद, पालीदेवद, आकुर्ली, आदई या ग्रामपंचायतींना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, या मागणीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको, एमआयडीसी, नवी मुंबई महापालिका आणि एमजेपीकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी गुरुवारी मंत्रालयात एक संयुक्त बैठक बोलाविली होती. या बैठकीला संबंधित प्राधिकरणांचे अधिकारी उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिका हद्दीच्या जवळ असलेल्या विचुंबे, देवद, पालीदेवद, आकुर्ली व आदई या ग्रामपंचायतींमधील गावांचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. त्यामुळे लोकसंख्याही वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत अत्यंत अपुरा पाणीपुरवठा होत आहे. जानेवारीपासून पाणीपुरवठ्यात आणखी कपात करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठ्याचा दुसरा स्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्यावर या गावांना विसंबून राहवे लागते. या पार्श्वभूमीवर या गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी मागणी आमदार प्रशांत पाटील यांनी या बैठकीत केली. तसेच सिडकोच्या नैना क्षेत्रात येणाऱ्या गावांना नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसीकडून पाणी मिळावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
नियोजित नैना क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने सिडकोने कोंढाणा धरणाचा विकास करण्याची तयारी दर्शविली आहे. तसा प्रस्ताव सिडकोच्या माध्यमातून राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय होईल. त्यामुळे भविष्यात या कोंढाणा धरणातून नैना क्षेत्र आणि पनवेल महापालिका क्षेत्राच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघेल, अशी ग्वाही राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी या वेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
विचुंबे, देवद, पालीदेवद, आकुर्ली व आदई या ग्रामपंचायतींमधील गावांची पाण्याची सध्याची गरज ओळखून तत्काळ पाणीपुरवठा करावा, असे निर्देश नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.