सार्वजनिक दुर्गंधीमुळे पनवेलकर हैराण

By admin | Published: March 21, 2016 02:05 AM2016-03-21T02:05:03+5:302016-03-21T02:05:03+5:30

स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या पनवेलकरांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. सिडको नोडसह नगरपालिका क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी पुरेशी सार्वजनिक शौचालयेच नाहीत

Panvelkar Haraan due to public mischief | सार्वजनिक दुर्गंधीमुळे पनवेलकर हैराण

सार्वजनिक दुर्गंधीमुळे पनवेलकर हैराण

Next

नामदेव मोरे, नवी मुंबई
स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या पनवेलकरांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. सिडको नोडसह नगरपालिका क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी पुरेशी सार्वजनिक शौचालयेच नाहीत. ६८ टक्के घरांमध्येच पाइप किंवा सेप्टिक टँकची सुविधा असून, ६४ टक्के परिसर अद्याप मलनिस्सारण केंद्रांशी जोडलेला नाही. सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच नदी व खाडीमध्ये सोडले जात असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.
सिडकोने दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा सिडकोने केली. परंतु ज्या परिसराचा उल्लेख केला तो सर्व पनवेल तालुक्याचा भाग आहे. वास्तविक या परिसरातील नागरी समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. सिडकोने खारघर, कामोठे, तळोजा, कळंबोली, नवीन पनवेल हा परिसर विकसित केला आहे. परंतु या परिसरात सार्वजनिक शौचालय उभारण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे या परिसरात मंडई, खरेदी व इतर रहदारीच्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना शौचालय नसल्याने उघड्यावर जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. पनवेल शहरामध्येही सार्वजनिक शौचालयांची संख्या कमी आहे.
पनवेल तालुक्यामध्ये एकूण १ लाख ६७ हजार सदनीकाधारक आहेत. यामधील फक्त ६४ टक्के घरांमध्येच शौचालयांची व मलनिस्सारण वाहिन्यांची सुविधा आहे. यामध्येही २४ टक्के ठिकाणी सेप्टिक टँकचा वापर केला जात आहे. शौचालय नसणारांची संख्या २५ टक्के नागरिकांसाठी शौचालयच नाही. सिडको कार्यक्षेत्रामध्ये मलनिस्सारण वाहिन्या टाकल्या आहेत. परंतु याच परिसरातील मूळ गावठाणांमध्ये मात्र अद्याप मलनिस्सारण वाहिन्या टाकलेल्या नाहीत. यामुळे सुनियोजित शहरामध्ये असूनही प्रकल्पग्रस्तांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
पनवेल नगरपालिकेने शहरात मलनिस्सारण वाहिन्या टाकल्या आहेत. बंदर रोडवर १४ एमएलडीचे मलनिस्सारण केंद्रही उभारले आहे. परंतु अद्याप शहरातील सर्व इमारती व घरे मलनिस्सारण वाहिन्यांशी जोडण्यात आलेली नाहीत. आतापर्यंत जवळपास ५० टक्के जोडण्याच पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित ठिकाणचे सांडपाणी प्रक्रिया न करताच गाढी नदीमध्ये व खाडीमध्ये सोडून दिले जात आहे. शहरामध्ये पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी गटार व्यवस्था तयार केली आहे, परंतु या नाल्यामध्ये बाराही महिने पाणी सोडले जाते.
नगरपालिकेने नालेही मलनिस्सारण वाहिन्यांशी जोडले आहेत. यामुळे नाल्यांमधील साठलेले पाणी बाहेर काढणे शक्य झाले आहे. सिडको नोड विकसित करताना मूळ गावेही याच परिसरात असून, तेथील इमारतींनाही मलनिस्सारण वाहिन्यांशी जोडणे आवश्यक असल्याची गरज ओळखून कामे करणे आवश्यक आहे अन्यथा शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येऊ शकेल.
> महापालिका झाली तरच प्रश्न सुटणार
1पनवेल तालुक्याचे पूर्णपणे शहरीकरण झाले आहे. या ठिकाणी शहर व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेसारखी यंत्रणा नाही. यामुळे गावांमध्ये ग्रामपंचायत, विकसित नोडमध्ये सिडको व पनवेल, नवीन पनवेलमध्ये नगरपालिकेकडे व्यवस्थापन आहे. तीन यंत्रणांमध्ये विभागल्यामुळे शहरामध्ये मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे विनण्यात अपयश आले आहे.
2देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याची घोषणा केलेल्या या परिसरात फक्त ६४ टक्के ठिकाणीच मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे असणे सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे मानले जात आहे.
> मूळ गावठाणांसाठी सुविधा नाही
सिडकोने विकसित केलेल्या नोडमध्ये मलनिस्सारण वाहिन्या टाकल्या आहेत.
परंतु या परिसरातील मूळ गावठाण व परिसरातील इमारती अद्याप मलनिस्सारण वाहिन्यांशी जोडलेल्या नाहीत. गावांमधील जबाबदारी ग्रामपंचायतीवर ढकलली जात आहे. यामुळे अनेक गावांमध्ये मलनिस्सारण वाहिन्यांमधील पाणी रोडवर येण्याच्या घटना घडतात. परिसरात दुर्गंधी पसरून डेंग्यू, मलेरियाची साथही पसरत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर हे शहर वसले त्याच प्रकल्पग्रस्तांना सुविधा दिल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होऊ लागली आहे.
> पर्यावरणाचे नुकसान : पनवेल परिसरामधील फक्त ६४ टक्के इमारती व सदनिका मलनिस्सारण वाहिन्यांशी जोडण्यात आल्या आहेत. उर्वरित ठिकाणी अद्याप वाहिन्या टाकलेल्या नाहीत. ज्या ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या टाकल्या आहेत तेथेही पूर्ण सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नाही. मलनिस्सारण वाहिन्यांमधील पाणी खाडी व नदीमध्ये सोडले जात आहे. एकेकाळी पनवेलकरांना पाणी पुरविणाऱ्या गाढी नदीचा वापरही सांडपाणी सोडण्यासाठी केला जात आहे.
> तालुक्यातील
यंत्रणेचा तपशील
पनवेल तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात एकूण १ लाख ६७ हजार घरे आहेत. यामधील ७४ हजार घरांमध्ये पाईप सिवर सिस्टीम आहे. ४०२१२ ठिकाणी सेप्टीक टँकचा वापर केला आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी ६४ टक्के बंदीस्त वाहिन्या आहेत. अद्याप १६ टक्के उघड्या गटारांमध्ये सांडपाणी सोडले जात आहे. तालुक्यामध्ये तब्बल ३२१५८ घरांना मलनिस:रण केंद्राशी जोडलेले नाही.
> नवी मुंबई पॅटर्न राबवावा
नवी मुंबईमध्ये महानगरपालिका शहरातील १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करीत आहे. यासाठी एकूण ४३४ एमएलडी क्षमता असणारी सात मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र उभारले आहेत. शहरात सांडपाणी वाहून नेण्यासाठी ५५० किलोमीटर लांबीच्या वाहिन्या टाकल्या आहेत. शहरातील मूळ गावठाणांमधील घरांनाही मलनिस्सारण वाहिन्यांशी जोडले आहे. पूर्ण शहराचे व्यवस्थापन महानगरपालिकेकडे असल्याने हे शक्य झाले आहे. पनवेल तालुक्यामध्ये तीन यंत्रणा असल्याने तेथील व्यवस्था कोलमडली आहे.
>पनवेलमधील मलनिस्सारण यंत्रणेची वस्तुस्थिती
मार्केट, बसस्थानक व इतर ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचा अभाव
तालुक्यामध्ये ६४ टक्के इमारतींमध्येच मलनिस्सारणाची योग्य व्यवस्था
शहर व ग्रामीण भागात २४ टक्के शौचालयांसाठी सेप्टिक टँकचाच वापर
२५ टक्के घरांमध्ये स्वतंत्र शौचालय नाही
पनवेल शहरातील ५०% इमारती मलनिस्सारण वाहिन्यांशी जोडलेल्या नाहीत
सांडपाणी पावसाळी गटारामध्ये सोडण्याचे प्रमाण जास्त
सांडपाणी प्रक्रिया न करताच नदी व खाडीत सोडले जाते
पनवेल शहरातील मलनिस्सारण केंद्राचा पूर्ण क्षमतेने वापरच नाही

Web Title: Panvelkar Haraan due to public mischief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.