पनवेल : नवीन पनवेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. एकीकडे धो धो पाऊस सुरू असताना नवीन पनवेलमधील रहिवाशांचा घसा अद्याप कोरडाच आहे. एमजेपीच्या माध्यमातून या ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, एमजेपीच्या माध्यमातून सुरळीत पाणीपुरवठा केला नसल्याने भाजप शिष्टमंडळाने सोमवारी एमजेपी अधिकाºयांची भेट घेतली. बैठकीत अधिकाºयांकडून समाधानकारक उत्तरे देण्यात न आल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
पनवेल महापालिकेत भाजप सत्तेवर आहे. पाणीटंचाईमुळे सत्ताधारी भाजपला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे पनवेलमध्ये जोरदार अतिवृष्टी असताना नागरिकांना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नसल्याने भाजपने एमजेपीच्या अधिकाºयांना ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. नवीन पनवेलमधील नागारिकांनी सोमवारी सकाळी स्थानिक नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना पाण्याची समस्या सांगितली. यानंतर भुजबळ यांच्यासह सर्व जण सिडकोच्या कार्यालयात गेले. तेथील टाकीत पाणी आहे; पण जनरेटर दोन वर्षे बंद असल्याने पाणीपुरवठा करता येत नसल्याचे समजले. त्यामुळे जनरेटर त्वरित सुरू करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.नवीन पनवेल सेक्टर १५ मधील पी ६ वसाहतीत गेला आठवडाभर पाणी नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या वसाहतीत सिडकोने पाण्याच्या भूमिगत टाक्या न बांधल्याने बिल्डिंगमध्ये चौथ्या मजल्यापर्यंत पाणी चढण्यासाठी पाण्याचा दाब जास्त असावा लागतो. मात्र, सध्या तो नसल्याने येथील रहिवाशांना पाणी मिळत नाही. त्यांना टँकरनेही पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. एमजेपीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला असून या वेळी उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, सुशीला घरत, अॅड. वृषाली वाघमारे आदीसह रहिवासी उपस्थित होते.