नामदेव मोरे, नवी मुंबई
पनवेल तालुक्यातील विकसित नोड व नैना परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोने ३२४४ कोटी रूपयांची योजना तयार केली आहे. परंतु महत्त्वाकांक्षी कोंडाणे, बाळगंगा धरणाचे काम सिंचन घोटाळ्यामुळे जवळपास ठप्प झाले आहे. यामुळे पुढील ५ ते १० वर्षे पनवेलकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोने दक्षिण नवी मुंबई हे देशातील पहिले स्मार्ट शहर होणार असल्याची घोषणा ४ डिसेंबरला केली. तेव्हापासून या परिसरात तीव्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. सिडको क्षेत्रासह पनवेल शहरामध्ये अनेक ठिकाणी दोन दिवसांमधून एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक ठिकाणी गरजेपुरतेही पाणी उपलब्ध होत नाही. तीन महिन्यांपूर्वीच ३३ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा जाणवू लागला होता. आता रोज ५० ते ५५ दशलक्ष लिटरपेक्षा जास्त तुटवडा भासू लागला आहे. सिडको व नगरपालिकेने शहराची होणारी वाढ लक्षात घेवून पाणीपुरवठा योजना राबविल्या नसल्यानेच येथील रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पनवेल शहराची लोकसंख्या जवळपास दोन लाख झाली आहे. परंतु नगरपालिका अद्याप देहरंग धरण व एमजेपीच्या जुन्याच योजनेवर अवलंबून आहे. सिडकोही हेटवणे, मोरबे व एमजेपीच्या भरोवशावरच शहराचा विकास करत आहे. पनवेल परिसरामध्ये विमानतळ होणार असल्याने भविष्यात शहराची वाढ खोपोलीपर्यंत होणार असल्याची जाणीव झाली होती. पण यासाठी आवश्यक असणारे पाणी कोठून येणार याविषयीचे नियोजन उशिरा करण्यात आले. यामुळे सद्यस्थितीमध्ये मागणी व प्रत्यक्षात पुरवठा यामध्ये तफावत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे बांधकामासाठी रोज लाखो लिटर पाण्याची गरज आहे. यासाठीही अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा वापर होत आहे. मलनि:सारण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात नवी मुंबई महापालिकेप्रमाणेच सिडकोलाही अपयश आले आहे. पाणी हीच भविष्यातील मोठी समस्या असल्याचे लक्षात आल्यामुळे सिडकोने आता पाण्यावर सर्वाधिक खर्च करण्याचे धोरण तयार केले आहे. सिडको महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बारवी धरणातून ४५ एमएलडी पाणी घेणार आहे. कोंढाणे धरणातून २०२१ पर्यंत २५० एमएलडी पाणी उपलब्ध करण्यासाठी १ हजार कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.> कोंढाणेचे काम रखडलेकर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणातून २५० एमएलडी पाणी मिळविण्याची सिडकोची योजना आहे. यासाठी १ हजार कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. २०२१ पर्यंत या योजनेतील पूर्ण पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे. परंतु सिंचन घोटाळ्याच्या चौकशीमुळे धरणाचे काम रखडले. हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याची शक्यता नाही. धरण बांधण्यासाठी जेवढा विलंब लागणार तेवढी टंचाई पनवेल व उरण तालुक्यातील सिडको क्षेत्रामध्ये निर्माण होणार असून योजनेवरील खर्चही वाढू शकतो. > बाळगंगा प्रकल्पाचे कामही अधांतरीच बाळगंगा प्रकल्पातून २०२३ पर्यंत ३५० एमएलडी पाणी उपलब्ध होवू शकेल असा सिडकोचा अंदाज आहे. या योजनेसाठी धरणाच्या कामासाठी ७०० कोटी व जमीन संपादन व पाइपलाइनसाठी ११०५ कोटीची तरतूद केली आहे. परंतु या धरणासाठी जमीन संपादनाचे कामही काही प्रमाणात रखडले आहे. बांधकामही थांबलेले असल्याने निश्चित वेळेत काम पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याने आवश्यक पाणी मिळण्यास विलंब होण्याची गरज आहे.