CoronaVirus News in Navi Mumbai: पनवेलकरांची बाजारपेठेत गर्दी, उपाययोजना फोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 01:02 AM2020-05-02T01:02:23+5:302020-05-02T01:02:46+5:30
पनवेल बाजारपेठेतील गर्दी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नसून, भाजीमार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड होत आहे.
पनवेल : एकीकडे पनवेलमधील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे नागरिकांमध्ये अद्याप कोरोना संसर्गाबाबत गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे, सोशल डिस्टन्सिंगचे पालनही अनेक ठिकाणी होताना दिसत नाही. पनवेल बाजारपेठेतील गर्दी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नसून, भाजीमार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड होत आहे.
पनवेल शहरातील विविध बाजारपेठेत सकाळ-संध्याकाळी गर्दी पाहवयास मिळत आहे. विशेषत: भाजी खरेदीच्या नावाखाली नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. शहरातील कर्नाळा सर्कलजवळील जुन्या भाजीमार्केट परिसरात नागरिकांची गुरुवारी मोठी गर्दी पाहवयास मिळाली. पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून नागरिक किरकोळ कारणासाठी बाहेर पडत आहेत. नवीन पनवेलमधील एका नागरिकाला मेडिकल दुकानातून कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अशाप्रकारे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिक अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. अशीच गर्दी खारघर, कामोठे, कळंबोलीमधील बाजारपेठेत करीत आहेत. विशेषत: मेडिकल, किराणा, भाजी आदी कारणे सांगून नागरिक घराबाहेर पडत आहेत. पनवेल परिसरात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रत्येकाने सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.