वैभव गायकर
पनवेल: पनवेलकरांचे पाणी संकट टळले आहे.मागील दोन दिवसांपासुन झालेल्या चांगल्या पावसामुळे धारण पूर्णपणे भरले आहे.विशेष म्हणजे धरणाचे पाणी सांडव्यातुन बाहेर जाऊ लागले असल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. पनवेल महानगरपालिकेने यावर्षी पाणीपुरवठ्याचे उत्तम नियोजन केले होते.पाणीपुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी याबाबत सूक्ष्म पाण्याचे नियोजन करीत पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ नये विभाग निहाय आठवड्यात एक दिवस पाणी कपात केली होती.यामुळे पावल्यापर्यंत धरणात पाणीसाठा कायम होता.
माथेरान डोंगराच्या पायथ्याशी पनवेल पालिकेच्या मालकीची 277 हेक्टर जमीन असून त्यापैकी 125 हेक्टरवर देहरंग धरण आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असणारी राज्यातील ही पहिलीच नगरपरिषद म्हणून पनवेलचे नावलौकिक होते.या धरणातून पनवेल शहराला पाणीपुरवठा केला जातो. माथेरानच्या डोंगराची माती वाहून आल्याने धरणाची साठवणूक क्षमता कमी झाली आहे. त्याचा परिमाण शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला. या ठिकाणाहून पनवेल शहराला उन्हाळा वगळता इतर वेळी प्रति दिन 16 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाण्याची दुप्पट मागणी आहे.याकरिता एमआयडीसी आणि एमजेपी कडून प्रत्येक 16 एमएलडी पाणी पालिका विकत घेते.मे अखेर धरण कोरडे पडल्यानंतर पालिकेला पाण्याकरिता पूर्णत: या दोन विभागांवर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी वाढीव कोटा घ्यावा लागतो आणि कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. गेल्या तीन दिवसांपासून देहरंग परिसरात समाधानकारक पाऊस पडला आणि धरणाने सांडवा पातळी गाठली. देहरंग धरण पूर्णक्षमतेने भरले असल्याने पनवेल शहराचे पाणी संकट टळले आहे.त्यामुळे आठवड्यातून एकदा पाणीकपात बंद केली असुन धरणातून नियमित 16 एमएलडी पाणी घेण्याचे नियोजन केले आहे.- विलास चव्हाण (पाणीपुरवठा अधिकारी,पनवेल महानगरपालिका )