पनवेलचा ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 07:04 AM2018-03-08T07:04:42+5:302018-03-08T07:04:42+5:30

पनवेल महापालिकेचा २०१८ - १९ आर्थिक वर्षासाठी ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्थायी समितीमध्ये सादर केला. पनवेलच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. पाणी, घनकचरा, आरोग्य, रस्ते व इतर पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद केली आहे. मनपाचे उत्पन्न वाढविण्यावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

 Panvel's budget of 516 crores | पनवेलचा ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प

पनवेलचा ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प

Next

पनवेल - पनवेल महापालिकेचा २०१८ - १९ आर्थिक वर्षासाठी ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्थायी समितीमध्ये सादर केला. पनवेलच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. पाणी, घनकचरा, आरोग्य, रस्ते व इतर पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद केली आहे. मनपाचे उत्पन्न वाढविण्यावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाकडे पनवेलवासीयांचे लक्ष लागले होते. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी ७४ कोटी रुपये शिल्लक असलेला ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. स्मार्ट, स्वच्छ सुंदर पनवेलचा संकल्प घेवून काम करणाºया शिंदे यांनी अर्थसंकल्पामध्येही शहराच्या सर्वांगीण विकासाचा समावेश केला आहे. २०१७ - १८ चा अर्थसंकल्प १२०० कोटींवरून ४३७ कोटी करण्यात आला असून सुधारित अर्थसंकल्पही स्थायी समितीमध्ये मांडण्यात आला.
महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता कराच्या माध्यमातून १०० कोटी, एलबीटीच्या माध्यमातून ९० कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. पालिकेने उत्पन्नासाठी तब्बल १२५ हेड तयार केले आहेत. उत्पन्नाचे मार्ग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. मालमत्ता कर हा उत्पन्नाचा स्रोत असणार आहे. पालिका मालमत्ता कराचे नवीन दर निश्चित करणार असून त्यानंतर उत्पन्नाचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. पालिकेला शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध होणार आहे.
आयुक्तांनी अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये मांडला. अर्थसंकल्प वास्तववादी असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. पायाभूत सुविधा विकसित करणे, रस्ते, गटार, पाणी, मलनि:सारण, उद्यान, पथदिवे व इतर सर्व सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पनवेलकरांनी कर रूपाने दिलेल्या पैशाचा योग्य वापर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
स्थायी समिती सभापती अमर पाटील यांनी अर्थसंकल्पावर पुढील आठवड्यात चर्चा करून त्याला अंतिम मंजुरी दिली जाईल, असे स्पष्ट केले.

पनवेलचा सर्वांगीण विकास करणारा वास्तववादी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर भर देण्यात येणार असून कर रूपाने नागरिकांनी दिलेल्या प्रत्येक पैशाचा योग्य वापर केला जाईल.
- डॉ. सुधाकर शिंदे,
आयुक्त

अर्थसंकल्पाच्या अखेरच्या शिलकीवर आम्ही समाधानी नाही. कामे होत नसल्याने मागील शिल्लक राहिली आहे. पुढील एक आठवडा सदस्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ देण्यात आला असून त्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा होईल.
- अमर पाटील,
सभापती, स्थायी समिती

मागील अर्थसंकल्प ४३८ कोटींचा होता. अर्थसंकल्पात केवळ १८ टक्के खर्च झाला नव्हता. नवीन बजेटमधील रक्कम जास्तीत जास्त विकासकामासाठी वापरली जावी.
- परेश ठाकूर,
सभागृह नेते, महापालिका

आयुक्तांनी ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला होता. पुढील सात दिवसांमध्ये अर्थसंकल्पावर अभ्यास करून शहर विकासाच्या योजनांचा समावेश करण्याच्या सूचना केल्या जातील.
- प्रीतम म्हात्रे,
विरोधी पक्षनेते

लेखाशीर्ष उत्पन्न
आरंभीची शिल्लक ७४
मालमत्ता कर १००
एलबीटी ९०
महसुली अनुदान ७२
भांडवली अनुदान ५९
पाणीपट्टी २५
एकूण ५१६

लेखाशीर्ष खर्च
आस्थापना खर्च ७४
बांधकाम १२५
अनुदानातून कामे ५३
शहर सफाई, महसुली ३६
विद्युत व उद्यान ३०
पाणीपुरवठा २८
प्रभाग समिती १४
इतर खर्च १२५
अखेरची शिल्लक ३१
एकूण ५१६

शहर स्वच्छतेसाठी ३६ कोटी
अर्थसंकल्पामध्ये शहर स्वच्छतेसाठी तब्बल ३६ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये कचरा हाताळणी, कचरा हाताळणीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करणे, स्वच्छ भारत अभियान राबविणे, साथीचे आजार पसरू नये यासाठी जनजागृती करण्यासाठीही अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे. कर्मचाºयांसाठी गमबूट व हँडग्लोज खरेदी करण्यात येणार आहे.

श्वान नियंत्रण कार्यक्रम
अर्थसंकल्पामध्ये आरोग्य विभागासाठीही तरतूद केली आहे. शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे. उंदरांचा सुळसुळाटही वाढला आहे. यामुळे श्वान नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी १० लाख व मूषक नियंत्रणासाठी तब्बल २० लाख रुपयांची तरतूद केली आहे. साथीचे आजार पसरू नयेत यासाठीची जनजागृती करण्यासाठी एक कोटीची तरतूद केली आहे.

Web Title:  Panvel's budget of 516 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.