वैभव गायकरपनवेल : देशभरात विविध राज्यातील आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या वस्तू पनवेलमध्ये विक्रीसाठी येत आहेत. केंद्र सरकारच्या आदिवासी कल्याण विभागामार्फत सायन-पनवेल महामार्गालगत खांदा वसाहतीत उभारलेले ट्राइब्स टॉवर हे देशभरातील आदिवासी बांधवांना रोजगार मिळवून देणारे केंद्र बनले आहे.आदिवासी कल्याण विभागाच्या माध्यमातून केंद्रांची फारशी प्रसिद्धी करण्यात आली नसली तरी देशभरातील १५०० हून आदिवासी संस्थांनी या ठिकाणी नोंदणी करून विविध प्रकारच्या जवळपास १७ हजार वस्तू विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये कपडे, ज्वेलरी, मूर्ती, शोभेच्या वस्तू, पेंटिंग्स आदीचा समावेश आहे. पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोराम, नागालॅण्ड, मेघालय, गुजरात, त्रिपुरा आदीसह प्रत्येक राज्यातील आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या दुर्मीळ वस्तू या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत.देशात मेक इन इंडिया चळवळ उभी राहत आहे. विविध कलाकृतींना देशभरातच बाजारपेठ मिळावी, हे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यापुढे जाऊन आदिवासी विकास मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यात अशा प्रकारे एक केंद्र उभारले आहे.पनवेलमधील ‘ट्राइब्स टॉवर’ हे महाराष्ट्रातील एकमेव केंद्र आहे, ज्या ठिकाणी देशभरातील आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या वस्तू एका छताखाली उपलब्ध आहेत. या वस्तूंमध्ये खाद्यपदार्थांचाही समावेश आहे. यामध्ये आदिवासी बांधवांनी गोळा केलेला मध, कॉफी, विविध प्रकारच्या मिर्च्या आदीचा समावेश आहे. याशिवाय आकर्षक असलेली साड्या, ट्रेंड, ज्वेलरी, शोभेच्या वस्तू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. लाकडांपासून तयार केलेल्या आदिवासींचे विविध वाद्य, भोपळ्यापासून तयार केलेले लॅम्प, नैसर्गिक रंग, वारली पेंटिंग, धातूपासून तयार केलेल्या शोभेच्या वस्तू, मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत.भारतातील दुर्मीळ, नामशेष होऊ घातलेल्या आदिवासी बांधवांच्या कला संस्कृतीला वाव मिळावा म्हणून ही संकल्पना राबविण्यात आली आहे. केवळ आदिवासी बांधवांनी तयार केलेली वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी ठेवली जात आहे.।आदिवासी संस्कृतीचे दर्शनदेशभरातील विविध राज्यातील आदिवासी बांधवांनी तयार केलेली विविध वस्तू त्यांची संकल्पना याचे आपणास या ठिकाणी दर्शन घडते. विशेष म्हणजे, टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना आदिवासी बांधव कशाप्रकारे अमलात आणतात, याचीही माहिती आपणास या वस्तू पाहिल्यावर मिळते.>छत्तीसगड येथील गौड या आदिवासी जमातीने तयार केलेली धातूची मूर्ती हे या ठिकाणचे आकर्षण आहे. सुमारे एक क्विंटल वजनाच्या या मूतीर्ची कलाकुसर अत्यंत नयनरम्य आहे. आदिवासी महिलेचा पेहराव या कलाकुसरीच्या माध्यमातून दाखविण्यात आला आहे.>नोंदणी केलेल्या आदिवासी बांधवांची माहिती विभागातर्फे घेण्यात येते, याकरिता जातीचा दाखला, आधार कार्ड तसेच व्यवसायाचे नोंदणीपत्र आदिवासी कल्याण विभागाला द्यावे लागते. महाराष्टÑातील एकमेव असलेल्या पनवेलमधील ‘ट्राइब्स टॉवर’ केंद्राला महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे पर्यटक भेट देत असतात, यामध्ये विदेशी पर्यटकांचाही समावेश असतो. आदिवासी बांधवांच्या कलाकुसरीचे दर्शन या ठिकाणी घडत असते.
>केवळ आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या आणि शासनाकडे नोंद असलेल्या वस्तूंची विक्री या ठिकाणी केली जाते. आदिवासी बांधवांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या दृष्टीने केंद्राच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाचा हा उपक्रम आहे. आदिवासी संस्कृती त्यांची कलाकुसर आदीचे दर्शन आपणास या ठिकाणी घडते.- अशोक सिन्हा,महाराष्ट्र क्षेत्रीयप्रबंधक, आदिवासीकल्याण मंत्रालय,भारत सरकार