आरक्षणामुळे बदलणार पनवेलची राजकीय गणिते
By admin | Published: February 7, 2017 04:13 AM2017-02-07T04:13:40+5:302017-02-07T04:13:40+5:30
महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत नुकतीच जाहीर झाली असून, त्यानुसार या पदावर अनुसूचित जातीतील उमेदवार बसणार आहे
वैभव गायकर, पनवेल
महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत नुकतीच जाहीर झाली असून, त्यानुसार या पदावर अनुसूचित जातीतील उमेदवार बसणार आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून महापौरपदाचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांसाठी हा मोठा धक्का असून, आरक्षणामुळे सर्वच राजकीय पक्षांची गणिते बदलणार आहेत.
स्थापनेपासून महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांची चाचपणी करणाऱ्या पक्षांनी आता आरक्षणानुसार अनुसूचित जातीतील तगड्या उमेदवाराचा शोध सुरू केला आहे.
भाजपा, शेकाप हे या निवडणुकीतील दोन महत्त्वाचे पक्ष आहेत. त्यामुळे महापौरपदाची चावी आपल्याच खिशात ठेवण्याकडे त्यांचा विशेष प्रयत्न आहे. मात्र दोन्ही पक्षांकडे या प्रवर्गातील काही मोजकेच सक्रिय कार्यकर्ते आहे, त्यामुळे या कार्यकर्त्यांचे नशीब फळफळले असून त्यांच्याकडे अनपेक्षितरीत्या सुवर्णसंधी चालून आली आहे.
शेकापमध्ये उषा अजित अडसुळे या प्रभाग क्र. सहामधील विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आहेत. त्यांचे पती अजित अडसुळे हे शेकापचे सक्रिय कार्यकर्ते असून अल्पावधीतच त्यांनी खारघर शहरात आपला वचक निर्माण केला आहे. शेकापच्या माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर या देखील पनवेल नगरपरिषदेत अभ्यासू नगरसेविका म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यामुळे त्यांचे नाव देखील शेकापमध्ये चर्चेत आहे. भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रकाश बिनेदार हे भाजपामधील सक्रिय आहेत. त्यामुळे आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवून महापौरपदाच्या शर्यतीत उतरवू शकतात. बिनेदारांसह माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड हे देखील आपल्या कुटुंबीयांना महापौरपदाच्या शर्यतीत उतरविण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यापूर्वी महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेक उमेदवारांची आरक्षणामुळे मोठी निराशा झाली आहे. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या पत्नी रायगड जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्ष कविता गायकवाड यांच्या नावाची देखील महापौरपदासाठी चर्चा आहे. शेकापसोबत आरपीआयची युती असताना गुळसुंदे जिल्हा परिषदेच्या विभागातून कविता गायकवाड निवडून येऊन थेट रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्या होत्या.
शेकापसोबत राष्ट्रवादी, काँग्रेस, समाजवादी पक्षांनी महाआघाडी स्थापन केली आहे. या महाआघाडीतून अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांचा विचार शेकापकडून महापौरपदासाठी होण्याची शक्यता आहे. भाजपा व आरपीआयची युती झाली असली तरी शिवसेना यावेळी स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पनवेल महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहता शेकाप, भाजपा हेच निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचे दावेदार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोपर्यंत पनवेल शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांची तारीख ठरत नाही, तोपर्यंत राजकीय गणिते बदलतच राहणार आहेत. तिकीट न मिळाल्यास इच्छुक उमदेवारांकडून पक्षांतर होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.