पनवेल : पनवेल आयटीआय येथील इंदिरानगर झोपडपट्टीला दुपारी एक-दीडच्या दरम्यान आग लागली. यात जीवितहानी झाली नसली तरी सात झोपड्या खाक होऊन लाखोंचे नुकसान झाले आहे. पनवेल बस स्थानक परिसरात आयटीआय कॉलेजच्या बाजूला लागून असलेल्या इंदिरानगर झोपडपट्टीला दुपारी अचानक आग लागली. मात्र अल्पावधीतच आगीने रौद्र रूप धारण केले. पोलीस आणि अग्निशमन यंत्रणेने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी ७ झोपड्या भस्मसात झाल्या. आगीची माहिती मिळताच आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आग लागताच येथील रहिवासी घराबाहेर पडले. संसाराची राख झाल्याचे पाहून महिलांनी हंबरडा फोडला होता. अवघ्या २० मिनिटांत अग्निशमनच्या तीन गाड्या व एक पाण्याचा टँकर घटनास्थळी पोहोचला. आगीत मुमताज काशीम शेख, महबूब काशीम शेख, रहमान शेख, कुबुद्दिन शेख, चांदबी शेख, संजय शेवाळकर, रवी मंजुळे यांच्या झोपड्या जळून खाक झाल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच येथील राजेश चव्हाण या युवकाने झोपड्यांमधील गॅस सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीत रहिवाशांचे मोठे नुकसान झाले आहे. महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त भगवान खाडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीमध्ये झोपडपट्टीवरून गेलेली महावितरणची वाहिनीही जळाल्याने शहरातील वीज खंडित केलीहोती. घटनास्थळी पनवेल महानगरपालिका आणि सिडकोच्या अग्निशमन विभागाचे ५० कर्मचारी तैनात होते.
पनवेलच्या इंदिरानगरमधील सात झोपड्यांना आग
By admin | Published: February 08, 2017 4:23 AM