पनवेलच्या तलाठी कार्यालयाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 11:19 PM2018-10-19T23:19:00+5:302018-10-19T23:19:22+5:30
- मयूर तांबडे पनवेल : शहरातील तलाठी कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. तलाठी कार्यालय मोडकळीस आले असून, शहरात सुसज्ज अशी नवीन ...
- मयूर तांबडे
पनवेल : शहरातील तलाठी कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. तलाठी कार्यालय मोडकळीस आले असून, शहरात सुसज्ज अशी नवीन वास्तू बांधून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
पनवेल शहरातील लाइनआळीत असलेले तलाठी कार्यालय मोडकळीस आले आहे. या ठिकाणी शहरातील सुरेश राठोड, मनीष जोशी, विचुंबे येथील अमोल घरत, कामोठे येथील अंकिता गोंधळी हे तलाठी कार्यभार पाहतात. तलाठी कार्यालयात पनवेल शहर, नवीन पनवेल, विचुंबे, कामोठे, खारघर आदी ठिकाणचे शेकडो नागरिक दररोज ये-जा करतात. कार्यालयातील भिंतींचे प्लॅस्टर निखळल्याने भिंती कधीही कोसळतील अशा स्थितीत आहेत, तर काही ठिकाणी भिंतींना तडे गेलेले आहेत. तर पत्र्यावर प्लॅस्टिकचे आच्छादन करण्यात आले होते. येथील बाथरूम पाण्याच्या प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्यांनी भरलेला आहे.
तलाठी कार्यालयाची जुनी वास्तू कधीही कोसळून पडेल, अशी भीती काम करणारे कर्मचारी व नागरिकांच्या मनात निर्माण झालेली आहे. मात्र, त्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे. मोडकळीस आलेली तलाठी कार्यालयाची नवीन वास्तू बांधण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. शहरातील लाइनआळी येथील तलाठी कार्यालयात ७/१२ नक्कल, गाव नमुना ६/८ च्या नकला, रहिवासी दाखले, उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले इ. चौकशी अहवाल तपासले जातात व दिले जातात. गौणखनिज बाबतचीही कामे या कार्यालयातून केली जातात. या कामांसाठी दिवसाला अनेक शेतकरी, नागरिक ये-जा करत असतात. त्याचबरोबर शिधापत्रिका चौकशी व अन्य सरकारी कामांसाठीही लोक येथे येत असतात. अशा वेळी जर अपघात घडला आणि जीवितहानी झाली तर यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित झाला आहे.