वैभव गायकर।लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिकेचा व्हिजन डॉक्युमेंट म्हणजेच शहर विकास आराखडा (सिटी डेव्हलपमेंट प्लॅन) तयार झाला आहे. पनवेल महापालिकेच्या विकासाच्या दृष्टीने पुढील २५ वर्षांसाठीचा आराखडा व्हिजन डॉक्युमेंटमध्ये तयार करण्यात आला आहे. भविष्यातील नागरीकरण, पाणीपुरवठ्याची गरज, लागणारा निधी आदींची माहिती या सीडीपीमध्ये आहे. नामांकित क्रिसल कंपनीने हा आराखडा तयार केला आहे.
सहा महिन्यांपासून हा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होते. याकरिता महापालिकेने सुमारे ३२ लाखांचा खर्च उचलला आहे. पनवेल महापालिकेच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भविष्यातील २५ वर्षात शहराला काय आवश्यक आहे, याचा अंतर्भाव आराखड्यात करण्यात आलेला आहे. शासनाच्या नियमानुसार पालिकेच्या स्थापनेनंतर तीन वर्षात पालिका क्षेत्राचा विकास आराखडा (डीपी ) तयार करणे गरजेचे असते. शहराच्या विकासाच्या दृष्टीने सामाजिक भूखंडांचे आरक्षण, रस्ते, उद्यान आदींसह महत्त्वाच्या गोष्टीचा समावेश असतो. आराखडा तयार केल्यानंतर महासभेत त्याला मंजुरी मिळाल्यावर अंतिम मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येतो.
पनवेल महापालिकेचे विकास आराखड्याचे काम देखील सुरू आहे. मात्र तत्पूर्वी शहराच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याकडे काय असावे, याकरिता आयुक्त गणेश देशमुख यांनी व्हिजन डॉक्युमेंट संकल्पना राबविली आहे. त्या सर्व्हेअंतर्गत समाजातील विविध घटकांच्या सूचनांचा देखील समावेश डॉक्युमेंटमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये वकील, डॉक्टर्स, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदींची मते आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. ५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विशेष सभेत हा सीडीपी मंजुरीसाठी सभेसमोर ठेवणार आहेत. सध्याच्या घडीला पनवेल महानगर पालिका क्षेत्रात पूर्वाश्रमीची नगरपरिषदेचा १९९३ चा आराखडा पनवेल शहरासाठी वापरत आहेत. खारघर, तळोजा, कामोठे, कळंबोलीसाठी सिडकोच्या विकास आराखड्याचा वापर केला जातो. त्यासह एमएमआरडीए क्षेत्रासाठी एमएमआरडीए आराखड्याचा वापर केला जात आहे.
सीटीपी बनविताना प्रामुख्याने तीन टप्प्यात त्याचे नियोजन केले गेले आहे. २०२५ पर्यंतच्या शॉर्ट टर्म विकासासाठी पनवेल महानगर पालिकेला सुमारे ५८८८ कोटी रुपयांची गरज आहे. त्यापुढे २०३२ पर्यंत पनवेल महापालिकेच्या वाढत्या गरजा लक्षात घेता आणखी २०५३ कोटींची गरज पालिकेला विविध प्रकल्प, नियोजन आदींसाठी लागणार आहे. लाँग टर्मच्या दृष्टीने २०४१ पर्यंत पनवेल महानगर पालिकेला २५७२ कोटींची गरज लागणार आहे. म्हणजेच २५ वर्षात पालिका क्षेत्रात विकासासाठी एकूण १०,५१४ कोटींची गरज लागणार आहे.व्हिजन डॉक्युमेंटमधील महत्त्वाच्या बाबीशहराचा विकास आराखडा (सीडीपी ) तयार करताना शहराची सद्यस्थिती, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, सांडपाणी नियोजन, पालिकेचे उत्पन्न, महत्त्वाच्या गरजा आदींबाबत सविस्तर माहिती या शहर विकास आराखड्यात देण्यात आली आहे.भविष्यात होऊ घातलेल्या विकासाचा वेध घेण्यासाठी परिपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. शहराचे नियोजन व विकासाची सांगड या आराखड्यात आहे.- गणेश देशमुख,आयुक्त, पनवेल महापालिका