पाच दशकांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा पक्षांतर; कामगार नेते ते मंत्रिपदापर्यंत प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 12:08 AM2019-09-12T00:08:20+5:302019-09-12T00:08:53+5:30

गणेश नाईकांनी अनुभवला तीन वेळा धक्कादायक पराभव

Paradox for the second time in five decades; The journey from labor leader to minister | पाच दशकांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा पक्षांतर; कामगार नेते ते मंत्रिपदापर्यंत प्रवास

पाच दशकांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा पक्षांतर; कामगार नेते ते मंत्रिपदापर्यंत प्रवास

Next

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीला या वर्षी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. कामगार नेते ते तीन वेळा मंत्रिपद मिळविण्यापर्यंतचे यश त्यांनी मिळविले. पाच दशकांच्या वाटचालीमध्ये तीन वेळा धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले असून, दोन वेळा पक्षांतर करावे लागले.

गणेश नाईक यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशामुळे नवी मुंबईमधील व ठाणे जिल्ह्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युतीमधील जागावाटपाचा तिढा वाढला असून, भाजपमध्येही उमेदवारीवरून नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पाच दशकांच्या राजकीय वाटचालीमध्ये नाईकांचा हा तिसरा पक्ष असून, दुसरे पक्षांतर आहे.

शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर १९६९ मध्ये त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. श्रमिक सेना या कामगार संघटनेची स्थापना केली. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत व रायगड जिल्ह्यामध्येही कामगार संघटनेचा दबदबा निर्माण झाला होता. या बळावरच त्यांनी १९८५ मध्ये बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढविली व त्यांना फक्त २२४१ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्यासाठी हा पहिला धक्कादायक पराभव होता. यानंतर १९९० मध्ये त्यांनी विजय मिळविला. १९९५ मध्ये पुन्हा विजय मिळवून युतीच्या मंत्रिमंडळामध्ये वनमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर मतभेद झाल्यानंतर त्यांना पक्ष सोडावा लागला. शिवशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम सुरू केले. शरद पवार यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले व उमेदवारी दिली; परंतु १९९९ च्या निवडणुकीमध्ये सीताराम भोईर या नवख्या उमेदवाराकडून त्यांना २७८६ मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
नाईक यांनी २००४ च्या निवडणुकीमध्ये तब्बल १ लाख १८ हजार मतांनी विजय मिळविला व काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये पर्यावरण व उत्पादन शुल्क मंत्री झाले. २००९ मध्येही पुन्हा मंत्रिपद मिळविले.

दहा वर्षे सलग ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविले असताना २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याकडून धक्कादायकपणे पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या लोकप्रियतेलाही ओहोटी लागल्याचे चित्र निर्माण झाले. २०१० ते २०१४ या चार वर्षांत नवी मुंबईमध्ये सर्व काही नाईक असे समीकरण तयार झाले होते. स्वत: मंत्री, मुलगा संजीव नाईक खासदार, दुसरा मुलगा संदीप नाईक आमदार, पुतणे सागर नाईक महापौर अशी स्थिती होती. पण २०१५ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथम संजीव नाईक यांचा पराभव झाला व नंतर विधानसभा निवडणुकीमध्ये गणेश नाईक पराभूत झाले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्येही शिवसेना उमेदवाराला ऐरोली व बेलापूरमधून तब्बल ८४ हजार मतांची आघाडी मिळाली. यानंतर पक्षांतराचे वारे सुरू झाले व संपूर्ण नाईक परिवार भाजपत डेरेदाखल झाला.

गणेश नाईकांच्या वाटचालीमधील महत्त्वाचे टप्पे

  • १९६९ शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात
  • १९८५ बेलापूर मतदारसंघामधून फक्त २,२४१ मतांनी पराभव
  • १९९० बेलापूर मतदारसंघातून २७,७६१ मतांनी विजय
  • १९९५ महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये सत्ता मिळविण्यात यश, संजीव नाईक २३ व्या वर्षी महापौर
  • १९९५ बेलापूर मतदारसंघातून तब्बल एक लाख नऊ हजार मतांनी विजय व युती सरकारमध्ये मंत्रिपद
  • १९९९ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर मतभेद झाल्यामुळे पहिल्यांदा पक्षांतर
  • १९९९ राष्ट्रवादी काँगे्रसच्या तिकिटावर निवडणूक लढविली व नवख्या उमेदवाराकडून २,७८६ मतांनी पराभव
  • २००४ बेलापूर मतदारसंघातून तब्बल एक लाख १८ हजार मतांनी विजय
  • २००९ बेलापूर मतदारसंघातून १२,८७३ मतांनी विजय
  • २००९ ऐरोली विधानसभा मतदारसंघातून मुलगा संदीप नाईक विजयी
  • २००९ लोकसभा निवडणुकीमध्ये मुलगा संजीव नाईक ठाणे मतदारसंघातून विजयी
  • २०१० पुतणे सागर नाईकची महापौरपदावर निवड
  • २०१४ ठाणे लोकसभा मतदारसंघातून संजीव नाईक यांचा पराभव
  • २०१४ बेलापूर मतदारसंघातून गणेश नाईक यांचा १,४९१ मतांनी पराभव
  • २०१९ लोकसभानिवडणुकीमध्ये नवी मुंबईमधून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्यात अपयश
  • जुलै संदीप नाईक व सागर २०१९ नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश
  • सप्टेंबर गणेश नाईक व संजीव २०१९ नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश

 

नवी मुंबईतील जनाधार घसरला
नवी मुंबईच्या राजकारणावर अनेक वर्षे गणेश नाईक यांचे एकहाती वर्चस्व होते; परंतु २०१० ते २०१४ या चार वर्षांत महापौर, खासदार, आमदार व मंत्री ही सर्व पदे घरामध्ये ठेवण्यात आली. यामुळे नाईकांवर घराणेशाहीचा शिक्का बसला.

नवी मुंबईमधील नवीन मतदारांना आकर्षित करण्यात अपयश आले. दुसºया पिढीतील सदस्यांना शहरवासीयांची मने जिंकण्यात अपयश आले. यामुळे जनाधार घसरून २०१४ मध्ये प्रथम ठाणे लोकसभा मतदारसंघात संजीव नाईक व नंतर बेलापूर मतदारसंघात गणेश नाईक यांना पराभवास सामोरे जावे लागले.

२०१५ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्येही पूर्ण बहुमत मिळू शकले नाही. यामुळे काँग्रेसच्या मदतीने सत्ता टिकवावी लागली. राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणुकीला सामोरे गेल्यास निवडून येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली होती.

Web Title: Paradox for the second time in five decades; The journey from labor leader to minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.