ग्रीनफिंगर्स ग्लोबल स्कूलविरोधात पालकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 01:49 AM2021-01-11T01:49:58+5:302021-01-11T01:50:15+5:30
ऑनलाइन शिक्षण बंद करण्याची धमकी: शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची घेणार भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पालकांकडून जादा फी वसूल करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करण्याची धमकी देणाऱ्या खारघर मधील ग्रीनफिंगर्स ग्लोबल स्कूलच्या विरोधात पालकांनी रविवारी शाळेपुढे आंदोलन केले. शाळेने वार्षिक शिक्षण शुल्क आणि इतर वाढीव शुल्क कमी केले नाही, तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा पालकांनी यावेळी दिला.
खारघर सेक्टर बारामधील ग्रीन फिंगर स्कूलमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहे. कोविडमुळे शैक्षणिक शुल्क वाढ करू नये, तसेच जे शुल्क न भरणार नाही, अशा विद्यार्थांवर कोणतीही कारवाई करू नये, असे शासनाच्या शिक्षण विभागाने अध्यादेश काढला आहे. मात्र, शाळेकडून जादा फी वसूल करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करण्याची धमकी देत असल्याचा आरोप पालक ताजेश काळे यांनी केला आहे.
या प्रश्नावर सोमवारी रायगड जिल्हा पनवेल विभागाचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांची भेट घेऊन शाळेवर कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे काळे यांनी सांगितले. पालकांनी बच्चू कडू यांची मंगळवारी मंत्रालयात भेट घेऊन ग्रीनफिंगर्स ग्लोबल स्कूलवर तडकाफडकी कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती दिली.
या आंदोलनासंदर्भात शाळेची प्रतिक्रिया घेण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजु वेदी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.