पनवेल : खारघरमधील इम्पेरियल शाळेने पालकांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता, विद्यार्थ्यांची आॅनलाइन शिकवणी बंद केल्यामुळे, पालकांनी मंगळवारी शाळेच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे.कोरोनामुळे शासनाने शाळेने विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण द्यावे, असे आदेश दिले आहे, तसेच आॅनलाइन शिक्षण देताना कोणत्याही मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, अशी स्पष्ट सूचना असताना, खारघर सेक्टर ३५ मधील इम्पेरियल शाळेने पालकांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता, मासिक शुल्कचा भरणा न केल्यामुळे आॅनलाइन शिकवणी बंद केली आहे, तर शाळेने घेतलेल्या आॅनलाइन परीक्षेची माहिती न दिल्यामुळे संतापलेल्या पालकांनी सामाजिक कार्यकर्ते अमर उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता शाळेच्या समोर आंदोलन केले आहे. जोपर्यंत शाळा व्यवस्थापन आॅनलाइन शिकवणी वर्ग सुरू करीत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली होती.आंदोलनात जवळपास दीडशे पालक सहभागी झाले होते. शाळा प्रशासनाचे पदाधिकारी उपस्थित नसल्यामुळे खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी शाळा मालक एन.एम. शेख यांच्याशी संपर्क साधून, येत्या गुरुवारी पालक आणि शाळा व्यवस्थापन यांची बैठक घेतले जाईल, असे आश्वासन दिल्यामुळे पालकांनी आंदोलन मागे घेतल्याचे सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज शेख यांनी सांगितले.या संदर्भात लेखी तक्रार आम्हाला प्राप्त झाली नाही. आॅनलाइन शिक्षण बंद करू नये, अशी शासनाची सूचना आहेत. या प्रकारची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.- नवनाथ साबळे,गट शिक्षणाधिकारी, पनवेल
इम्पेरियल शाळेविरोधात पालकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 1:08 AM