पनवेल - खांदा वसाहत सेक्टर-१३ येथील न्यू होरिझन पब्लिक स्कूलविरोधात पालकांनी शनिवारी आंदोलन पुकारले, या वेळी शाळा व्यवस्थापनाने २४ नोव्हेंबर रोजीच्या मिटिंगमध्ये चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे पालकांना सांगितले आहे.खांदा कॉलनीतील न्यू होरिझन पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी ते बारावीपर्यंत पाच हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळेत पीटीए सदस्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. शाळा स्नेहसंमेलन करण्यासाठी ६५० रु पये घेत असून, ते पैसे कमी करून ते आॅनलाइन पद्धतीने घेण्यात यावेत व त्याची पावती मिळावी. कोणतेही कार्यक्रम घेताना पीटीए मेंबरला विश्वसात घेण्यात यावे, वेबसाइटवर शिक्षकांची माहिती देण्यात यावी. विशेष सर्वसाधारण सभा प्रत्येक वर्षी घ्यायला हवी. मात्र, ती होत नसल्याचा आरोप पालक काझमी दळवी यांनी केला. प्रायव्हेट पुस्तक न देता एनसीईआरटीची पुस्तके देण्यात यावीत.शाळेची फी व इतर चार्जेस आॅनलाइन पद्धतीने घेण्यात यावेत, अशा मागण्या पालकांनी केल्या आहेत. या वेळी शाळा व्यवस्थापनातर्फे येत्या २४ तारखेला या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
पनवेलमधील न्यू होरिझन शाळेवर पालकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 3:26 AM