लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नेरुळमधील सेंट आॅगस्टीन शाळेतील विद्यार्थ्यांचा परीक्षेचा निकाल देण्यास शाळा प्रशासनाने नकार दिला आहे. विद्यार्थ्यांनी वाढीव फी न भरल्याचे कारण सांगत निकालासाठी अडवणूक केली जात असल्याची तक्रार पालकांनी केली. पालकांनी शाळा प्रशासनाची भेट घेऊन निकाल न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला.दरवर्षी शाळेच्या वतीने फीवाढ केली जात असून सर्वसामान्यांना ही फीवाढ परवडणारी नाही. शाळा प्रशासनाला विचारले असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही अशी तक्रार पालकांनी केली. पीटीएची बैठक न घेताच फीवाढ कशी केली जात आहे असा सवालही या विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थित केला. फीसाठी अडवणूक करणारे हे शाळा प्रशासन पालकांची लूट करत असल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. पीटीएच्या बैठकीत वाढीव फीच्या प्रस्तावाला जोपर्यंत एकमताने रीतसर मंजुरी मिळत नाही तोपर्यंत वाढीव फी न भरता पूर्वी असलेली फी भरणार असल्याचे पालकांनी स्पष्ट केले. या शाळेतील ५०० पालकांनी वाढीव फी भरण्यास नकार दिला आहे. वाढीव फी न भरलेल्या विद्यार्थ्यांबाबत भेदभाव केला जातो. त्यांचा अपमान केला जातो. तसेच परीक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिका न देणे, गृहपाठ न तपासणे, शाळेतील विविध कार्यक्रमात सहभागी न करून घेणे, वर्गासमोर फी न भरल्याने उभे करणे आदी प्रकार घडत असल्याचे यादरम्यान उघडकीस आले आहेत. शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना अशी वागणूक देणे चुकीचे असून पालकांनी पोलीस आणि शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार केल्याचेही पालकांनी सांगितले. तक्रार करूनही या घटनेसंदर्भात कारवाई न झाल्याचे सरिता ढामले यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांमधील भेदभाव आणि वाढीव फीसारख्या समस्या तत्काळ न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा शाळा प्रशासनाला देण्यात आला आहे.
नेरुळमध्ये शाळेविरोधात पालकांचा संताप
By admin | Published: May 13, 2017 1:20 AM